Breaking भरलं हो भरलं! येळगाव धरण १०० टक्के भरलं; पुलावरून पाणी, चिखली–बुलडाणा मार्ग तासाभरापासून बंद!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाले आणि धरणे तुडुंब भरू लागली असून जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील महापुरानंतर आता बुलडाणा तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण आज दुपारी शंभर टक्के भरले असून धरण परिसरातील परिस्थिती गंभीर बनली आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर चिखली–बुलडाणा मार्गावरील येळगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. गेल्या तासाभरापासून वाहतूक ठप्प असून पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक प्रवासी आणि वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

घटनास्थळी पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित यंत्रणा दाखल झाली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पुराच्या पाण्याचा वेग लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत वाहन पुलावरून नेण्याचा प्रयत्न करू नये, तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत अद्यापही पावसाची संततधार सुरू असल्याने नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पूरग्रस्त किंवा पाण्याखाली गेलेल्या मार्गांपासून दूर राहावे आणि कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.