बुलडाणा जिल्ह्यात भाजपच नंबर वन ! ४ नगराध्यक्षांसह ८९ नगरसेवकांनी उधळला गुलाल; काँग्रेसलाही चांगले यश..भाजपच्या विजयात घाटाचाखालच्या तालुक्यांचा मोठा वाटा!
Dec 21, 2025, 17:30 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातल्या ११ नगरपालिकांचे निकाल आज जाहीर झाले. घाटावरील चिखली आणि घाटाखालील ३ नगरपालिकामध्ये भाजपने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. यासह २८६ पैकी सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आणत भाजप जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. अर्थात भाजपच्या विजयात घाटाखालील भागाचा मोठा वाटा राहिला, घाटावरच्या नगरपालिकात मात्र चिखलीचा अपवाद वगळता भाजपला मोठे यश मिळाले नाही. घाटावरच्या सहा नगरपालिकांत भाजपचे केवळ २० नगरसेवक निवडून आले,यात एकट्या चिखलीचा वाटा १३ नगरसेवकांचा आहे.
संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता भाजपनंतर काँग्रेस २ नंबरचा पक्ष ठरला आहे. लोणार, मलकापूर आणि शेगावच्या नगराध्यक्ष पदासह काँग्रेसचे ६० नगरसेवक निवडून आले आहेत. घाटावर काँग्रेसचे ३३ नगरसेवक निवडून आलेत,यात सर्वाधिक १२ चिखली, ८ लोणार आणि मेहकरच्या ११ नगरसेवकांचा समावेश आहे. जिल्ह्यात शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. बुलढाण्याचे नगराध्यक्षपद आणि एकूण ४६ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहे.
४६ पैकी ४२ नगरसेवक घाटावर निवडून आले असून एकट्या बुलडाण्याचा वाटा २२ नगरसेवकांचा आहे . अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात चौथ्या क्रमांकाची यश मिळाले आहे, त्यात देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षपदासह एकूण २६ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला एका नगराध्यक्ष सह १३ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. शिवसेना उबाठा पक्षाला मेहकरच्या नगराध्यक्ष पदासह १० नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे.. एकंदरीत जिल्ह्यात भाजपा नंबर एक तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
