भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंची आ.संजय गायकवाडांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस! कायदेतज्ञ असीम सरोदेंनी घेतले शिंदेंचे वकीलपत्र!
आ.गायकवाडांवर पोक्सोसह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचीही एसपींकडे मागणी..
Jun 10, 2026, 09:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातून विस्तव देखील जात नाही. दोघांमधील कटुता आणखी वाढत जात आहे.. दोघांमधील राजकीय संघर्ष आता कायदेशीर लढाईच्या टप्प्यावर पोहोचला आहे. विजयराज शिंदे यांनी जेष्ठ विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत गायकवाड यांना शंभर कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मानहानीची नोटीस बचावली आहे. याशिवाय बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्वतंत्र नोटीस पाठवून आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध पोक्सो कायदा, ॲट्रॉसिटी कायदा आणि इतर संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
संजय गायकवाड यांनी एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजयराज शिंदे यांच्यावर आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषणाबद्दल आरोप केला होता. हे आरोप खोटे, पूर्णपणे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप विजयराज शिंदे यांनी केला आहे.
नोटीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे आमदार गायकवाड यांच्याकडे अशा स्वरूपाच्या कथित गुन्ह्यांची माहिती असल्यास त्यांनी पोक्सो कायद्यानुसार ती संबंधित यंत्रणांना कळविणे बंधनकारक होते. तसे न करता केवळ माध्यमांसमोर आरोप करण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या नोटीस मध्ये करण्यात आली आहे.
मानहानीच्या नोटीस मध्ये गायकवाड यांनी पंधरा दिवसाच्या आत बिनशर्त जाहीर माफी मागावी, १०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी आणि भविष्यात अशा प्रकारची विधाने टाळावी अशी मागणी केली आहे. अन्यथा फौजदारी, मानहानी तसेच दिवाणी दाव्यासह पुढील न्यायालयीन कारवाई करण्यात येईल अशा इशारा देखील नोटीस द्वारे देण्यात आला आहे. दरम्यान विजयराज शिंदे यांच्या नोटीस वर आमदार संजय गायकवाड आज १० जून रोजी भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे..