चाइल्ड हेल्पलाईन बुलढाणाला मोठे यश; महिनाभरात २४ बालविवाह रोखलेबालविवाहाची माहिती तात्काळ 10980 वर द्या; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

 
 बुलढाणा, (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलढाणा यांनी मागील एका महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २४ बालविवाह रोखण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून प्रशासनाने ॲक्शन मोडमध्ये काम करत ही प्रभावी मोहीम राबविली.

चाइल्ड हेल्पलाईन 1098 बुलढाणा यांना प्राप्त झालेल्या २४ तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
चाइल्ड हेल्पलाईन टीममधील प्रकल्प समन्वयक श्री. शेख, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, केस वर्कर प्रवीण गवई, मुकेश मोरे आणि राहुल सुरडकर यांनी गावपातळीवरील ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांच्याशी समन्वय साधत संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही केली.
तक्रार प्राप्त होताच चाइल्ड हेल्पलाईन टीमने घटनास्थळी धाव घेत संबंधित पोलीस स्टेशन, पोलीस हेल्पलाईन 112, ग्रामीण व शहरी भागातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच अंगणवाडी यंत्रणेसोबत समन्वय साधून बालिकांचे विवाह थांबविले. त्यानंतर संबंधित बालिकांना पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समिती, बुलढाणा यांच्यासमोर हजर करण्यात आले.
बालकल्याण समितीने बालिकांची मुलाखत घेऊन प्रकरणांची सखोल चौकशी केली. काही गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित बालिकांची रवानगी शासकीय बालिका गृह, बुलढाणा येथे करण्यात आली. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील समुपदेशक शारदा पवार आणि चाइल्ड हेल्पलाईन समुपदेशक विद्या खरे यांनी बालिकांचे समुपदेशन करून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सर्वाधिक ५ बालविवाह रोखण्यात आले असून देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा येथे प्रत्येकी ४, लोणार येथे ३, मेहकर, मोताळा आणि बुलढाणा येथे प्रत्येकी २ तर मलकापूर आणि खामगाव येथे प्रत्येकी १ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे.