अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! बुलढाण्याला सर्वाधिक १०.९९ कोटींची मदत; १२ हजारांहून अधिक शेतकरी लाभार्थी

 
 बुलढाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने अकोला, बुलढाणा आणि भंडारा या तीन जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण १३ कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली असून, त्यापैकी सर्वाधिक १० कोटी ९९ लाख ३९ हजार रुपयांचा निधी बुलढाणा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने २५ जून २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. मंजूर झालेली मदत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

शासन निर्णयानुसार, तिन्ही जिल्ह्यांतील १४ हजार ७१६ बाधित शेतकऱ्यांच्या ७ हजार ९३४.७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी ही आर्थिक मदत वितरित केली जाणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा सर्वाधिक वाटा आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील १२ हजार ५२ बाधित शेतकऱ्यांच्या ६ हजार ६१०.६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीपोटी १० कोटी ९९ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील १ हजार ४७६ शेतकऱ्यांच्या ९७५.३१ हेक्टर क्षेत्रासाठी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपये, तर भंडारा जिल्ह्यातील १ हजार १८८ शेतकऱ्यांच्या ३४८.७८ हेक्टर क्षेत्रासाठी ५९ लाख ३३ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मदत वितरण प्रक्रियेदरम्यान कोणत्याही लाभार्थ्याची दुबार गणना होणार नाही, याची दक्षता जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयांनी घ्यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच एका हंगामात विहित दरानुसार एकदाच मदत दिली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे मंजूर झालेली मदत बँकांनी कर्जवसुलीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी अडवू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

मदत वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा सविस्तर तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच निधीच्या खर्चाचे लेखापरीक्षण आणि ताळमेळाची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीस मंजुरी दिल्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.