अत्याचारग्रस्त महिलांना मोठा दिलासा! बुलढाण्यात मिशन शक्ती अंतर्गत सुरू होणार "वन स्टॉप सेंटर ..." शासनाची मंजुरी

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):घरगुती हिंसा, लैंगिक अत्याचार, कौटुंबिक छळ तसेच विविध संकटांना सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी बुलढाणा जिल्ह्यात मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र पुरस्कृत ‘मिशन शक्ती’ योजनेंतर्गत ‘संबल’ उपयोजनेअंतर्गत बुलढाण्यात ‘वन स्टॉप सेंटर’ सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, यामुळे संकटग्रस्त महिलांना आता एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत उपलब्ध होणार आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पीडित महिलांना मदतीसाठी पोलिस ठाणे, रुग्णालय, न्यायालय, समुपदेशन केंद्र अशा विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. अनेकदा तातडीची मदत न मिळाल्याने महिलांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता शासनाच्या या निर्णयामुळे अशा महिलांना मोठा आधार मिळणार आहे.
प्रस्तावित ‘वन स्टॉप सेंटर’मध्ये पीडित महिलांसाठी वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला, पोलिस सहाय्य, तात्पुरता निवारा, मानसोपचार, समुपदेशन तसेच आवश्यक ती तातडीची मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये धावपळ करण्याची गरज राहणार नसून त्वरित आणि समन्वयित मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, महिलांच्या सुरक्षेची गरज आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र शासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर केला होता. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार हे केंद्र प्रत्यक्ष कार्यान्वित झालेल्या तारखेपासून सुरू मानले जाणार आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ सुरू होणार असल्याने महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून सामाजिक क्षेत्रातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.