BIG NEWS बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मशाल पेटणार! जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवतांच्या नेतृत्वात आजपासून मशाल यात्रा! मोताळ्यातून होणार सुरूवात!

गावागावांत मशाल येणार, समस्यांचा अंधकार मिटवणार;  बुधवंत म्हणाले,ही लढाई परिवर्तनाची..... 

 
Budhvat

मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात आज,५ सप्टेंबरपासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा निघणार आहे. आज मोताळा शहरातून या मशाल जागर यात्रेला सुरुवात होत आहे.१७ दिवस ही यात्रा चालणार असून यादरम्यान मतदारसंघातील १५२ गावांत जागर करीत २३ सप्टेंबरला ही यात्रा बुलडाणा शहरात येणार आहे.

२३ सप्टेंबरला या यात्रेचे आक्रोश मोर्चात रूपांतर होणार असून शिवसेना नेते खा.अरविंद सावंत,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या आक्रोश मोर्चाला संबोधित करण्यासाठी बुलडाण्यात येणार आहे. "गावागावात मशाल येणार, समस्यांचा अंधकार मिटवणार" ही टॅगलाईन घेऊन ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे.

दरम्यान या यात्रेची भूमिका सांगताना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना म्हणाले की, राज्य सरकार कमिशन खोरीत व्यस्त आहे. महाभ्रष्टाचाराचा कळस म्हणजे हे खोकेवाल्यांचे सरकार आहे. या सरकारचा पाया गद्दारी आहे. त्यामुळे स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या आणि सर्वसामान्य व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे हेच या सरकारचे धोरण आहे.

राज्यात मायमाऊल्यांची अब्रु सुरक्षित नाही आणि हे म्हणतात की आमचे सरकार हे शिवरायांच्या विचारांवर चालणारे आहे, हा किती विरोधाभास आहे? असा सवाल बुधवंत यांनी केला. जनसामान्यांच्या आक्रोशाला मोकळी वाट करून देण्यासाठी व शिवसेनेच्या विचारांचा जागर करण्यासाठी ही मशाल यात्रा असल्याचे बुधवंत म्हणाले. जी परिस्थिती दिल्लीत तीच राज्यात आहे, तेच विदारक चित्र बुलडाणा विधानसभा मतदारसंघात असल्याचेही बुधवंत म्हणाले.

कमीमिशनखोरी आणि गुंडागिरीला उत आल्याचे बुधवंत म्हणाले. मात्र यावर शिवसेना आणि महाविकास आघाडी हेच एकमेव उत्तर असल्याचेही ते म्हणाले. मशाल यात्रा गावागावांत समस्यांचा अंधकार दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले...

 

यात्रेचा पहिला दिवस असा...

आज ,५ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता मोताळा शहरातून यात्रेला प्रारंभ होईल. १२ ते २:३० या वेळेत यात्रा मोताळा शहरात राहील. त्यानंतर ३ वाजता सांगळद, ३:३० वाजता तिघ्रा, ४ वाजता आडविहीर, ४:३० वाजता जयपूर, ५ वाजता वरूड, ५:३० वाजता खरबडी, सायंकाळी ६ वाजता इब्राहिमपूर, ६:३० वाजता लोणघाट व सायंकाळी ७ वाजता कोथळी येथे मशाल यात्रेचा जागर होणार आहे...