BIG News संदीप शेळकेंनी शिवसेना सोडली! जिल्हाप्रमुख बुधवतांकडे सोपवला राजीनामा; म्हणाले, वेळ देता येत नाही म्हणून.... खरं कारण दुसरच?
वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून बुलढाणा लोकसभेत परिवर्तनाचा नारा देणाऱ्या संदीप शेळकेंनी अख्खा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन मांडून "विकासाच्या राजकारणावर" भर देणाऱ्या शेळकेंना लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी राजकारण्यांच्या भाऊगर्दीत विकासावर बोलणारा माणूस म्हणून त्यांनी जिल्हाभर चांगली ओळख मिळवली.
निवडणुकीनंतर त्यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश घेतला. शेळकेंचे संघटन कौशल्य लक्षात घेत त्यांनी जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली, त्यानंतर शिवसेनेच्या संघटनात्मक कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले. मात्र आता त्यांनी एकाएकी शिवसेनेचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जिल्हाप्रमुख बुधवतांकडे सोपवलेल्या राजीनामा पत्रात कौटुंबिक व्यापामुळे पक्ष संघटनेला अपेक्षित वेळ देता येत नसल्याचे म्हटले आहे, मात्र शेळके यांच्या राजीनाम्याचे कारण वेगळेच असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
संदीप शेळके काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. काँग्रेसमध्ये राहुल बोंद्रे अनेक वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर कायम आहेत, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यात काँग्रेसला आलेली मरगळ दूर करण्यासाठी आता स्वतः सपकाळ यांनी संघटनेत फेरबदल करण्याचे निश्चित केले आहे. त्यादृष्टीने नव्या आणि दमदार नेतृत्वाची गरज लक्षात घेता संदीप शेळकेंकडे काँग्रेसने प्रस्ताव मांडल्याची आणि शेळकेंनी तो प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे पुढील जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप शेळके यांच्याकडे जबाबदारी येण्याची चिन्हे आहेत..अर्थात हे राजकारण आहे..काय होईल सांगता येत नाही.