BIG NEWS ‘या राज्याचा नाथ पुन्हा एकनाथ व्हावा!’ एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी; देवेंद्र फडणवीसांनी आता देश सांभाळावा, आमदार संजय गायकवाडांचे मोठे विधान!
Nov 28, 2026, 17:35 IST
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. त्यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात विकासाचा जो झंझावात पाहायला मिळाला, तशीच अपेक्षा आजही जनता आणि आमदार करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी भूमिका बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनात बसलेले नेते आहेत. या राज्याचा नाथ पुन्हा एकनाथ व्हावा, अशी महाराष्ट्रातील जनतेची भावना असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील भूमिकेबाबतही भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बराच काळ काम केले आहे. आता त्यांनी देश सांभाळावा. देश सांभाळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, असे गायकवाड म्हणाले. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय राजकारणात जावे, अशी भूमिका सत्ताधारी शिवसेनेच्या आमदाराने जाहीरपणे मांडल्याने या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आता भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.