BIG NEWS आला हो आला.. महाराष्ट्रात मान्सून आला! पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात धो धो कोसळणार! २५ जिल्ह्यांना अलर्ट.... बुलढाण्याचाही समावेश

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय.. अखेर मायबाप शेतकऱ्यांना ज्याची अपेक्षा होती तेच झालं..तीन दिवस उशिरा का होईना पण मान्सूनची महाराष्ट्रात धडाकेबाज एन्ट्री झाली आहे. नैऋत्य मान्सून ने आज "तळ–कोकणात" प्रवेश करत महाराष्ट्रातील पावसाळ्याची अधिकृत सुरुवात केली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने तो लवकरच राज्याच्या उर्वरित भागात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. तब्बल २५ जिल्ह्यांना हा अलर्ट दिला आहे..

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी राज्यातील २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी हा अलर्ट २१ जिल्ह्यांना असेल. सोमवारी ६ जिल्हे ऑरेंज अलर्टच्या कक्षेत असणार आहेत. 


गोवा, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४० ते ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 

उत्तर कोकणातील काही भागात पावसासोबतच उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात पावसाच्या सरींबरोबर प्रचंड उखाण्याचा देखील सामना नागरिकांना करावा लागू शकतो. रत्नागिरी ,रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे ,कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर,परभणी ,बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या २५ जिल्ह्यांना रविवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.