रक्षाबंधनासाठी मोठी बातमी! रविवारीही बुलडाण्यातील ९ प्रमुख डाकघरं राहणार सुरू; राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्टवर थेट १०% सवलत, परदेशातही पाठवता येणार राखी!

 
 बुलडाणा (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने भावाला राखी वेळेत पोहोचवण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन बुलडाणा डाक विभागाने यंदा विशेष व्यवस्था केली असून, रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील तब्बल ९ प्रमुख डाकघरांमध्ये राखी बुकिंगची सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारीही बहिणींना राखी पाठवण्याची संधी मिळणार आहे.

बुलडाणा प्रधान डाकघर, खामगाव प्रधान डाकघर, चिखली उप डाकघर, शेगाव उप डाकघर, मलकापूर उप डाकघर, नांदुरा उप डाकघर, देऊळगाव राजा उप डाकघर, मेहकर उप डाकघर आणि जळगाव उप डाकघर येथे रविवारच्या दिवशी राखी बुकिंग करता येणार आहे.

स्पीड पोस्टवर थेट १० टक्के सवलत!

राखी वेळेत, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने भावापर्यंत पोहोचावी यासाठी डाक विभागाने स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे रक्षाबंधनानिमित्त राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्टच्या दरावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे राखी पाठविणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा अधिक फायदेशीर ठरणार आहे.

परदेशात असलेल्या भावालाही पाठवता येणार राखी

नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त परदेशात राहणाऱ्या भावंडांसाठीही डाक विभागाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आंतरराष्ट्रीय टपाल सेवेद्वारे माफक दरात परदेशात राखी पाठवता येणार आहे. याशिवाय राखी सुरक्षितपणे पाठवण्यासाठी विशेष राखी लिफाफेही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा वेळेत आणि सुरक्षितपणे आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचावा, यासाठी नागरिकांनी स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा आणि १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव यांनी केले आहे.रविवारची सुट्टी असली तरी राखी पाठवण्याची चिंता नाही; २३ ऑगस्टला जिल्ह्यातील ९ प्रमुख डाकघरांची दारे राखी बुकिंगसाठी खुली राहणार आहेत.