BIG NEWS खादाड विस्तार अधिकारी पैसे खातांना पकडला! जळगाव जामोद पंचायत समितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई...
Jul 15, 2026, 15:35 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज १५ जुलैच्या दुपारी जळगाव जामोद पंचायत समितीत झालेल्या एका कारवाईने खळबळ उडाली आहे. पंचायत समितीचा विस्तार अधिकारी चांगलाच खादाड निघाला, त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार लाचखोर खादाड विस्तार अधिकाऱ्याचे नाव संदीप मोरे असे आहे. एका जणाचे साडेआठ लाखांचे बिल काढून देण्यासाठी खादाड मोरेने तिन टक्के लाचेची मागणी केली होती. मात्र लाच द्यायची इच्छा नसल्याने संबंधित तक्रारदाराने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.
तक्रारीच्या पडताळणी कारवाईत तक्रारीची सत्यता पडताळणी झाल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचून कारवाई केली. ठरल्यानुसार तक्रारदाराने विस्तार अधिकाऱ्याला ठरलेली रक्कम दिली, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या मोरेवर एसीबी पथकाने झडप घालून त्याला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.