BIG NEWS : जिल्हा बँक निवडणुकीत सहकारची चौथी बाजी!; प्रा. कृषी पतपुरवठा संस्था लोणार मतदारसंघातून संतोष मापारींचा दणदणीत विजय, प्रतिस्पर्ध्याला अवघी ६ मते

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत चौथा निकालही सहकार पॅनलच्या बाजूने लागला आहे. प्रा. कृषी पतपुरवठा संस्था लोणार मतदारसंघातून सहकार पॅनलचे संतोष मापारी यांनी ३० मते मिळवत दणदणीत विजय मिळवला.

त्यांच्या प्रतिस्पर्धी स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलच्या शिवनंदा रामकिसन खंडे यांना केवळ ६ मते मिळाली. त्यामुळे मापारी यांनी तब्बल २४ मतांनी विजय मिळवत या मतदारसंघात सहकार पॅनलचे वर्चस्व सिद्ध केले.विशेष म्हणजे आजच्या मतमोजणीत सुरुवातीच्या चार निकालांपैकी तीन निकाल सहकार पॅनलच्या पारड्यात गेले आहेत. पहिल्या निकालात बुलढाणा मतदारसंघातून सुनील उदयकार विजयी झाले, तर मलकापूरमधून शेतकरी परिवर्तन पॅनलचे शिवा तायडे यांनी बाजी मारली. त्यानंतर संग्रामपूरमधून श्रीकांत मारोडे आणि आता लोणारमधून संतोष मापारी यांनी सहकार पॅनलला विजय मिळवून दिला.

त्यामुळे सुरुवातीच्या चार निकालांनंतर ‘एक त्यांचा... तीन यांचा!’ असे चित्र निर्माण झाले आहे. आता उर्वरित निकालांमध्ये शेतकरी परिवर्तन पॅनल कमबॅक करते की सहकार पॅनल आपली आघाडी आणखी भक्कम करते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जिल्हा बँकेच्या सत्तेची समीकरणे कोणाच्या बाजूने झुकणार? याचे उत्तर आता पुढील निकालांमधून मिळणार आहे.