मोठी बातमी! प्रशासन दखल घेत नाही, तुपकरांच्या मनात काय चाललंय? अन्नत्याग आंदोलन स्थगित न करता कोणत्याही क्षणी मुंबईसाठी रवाना होण्याची शक्यता! सूत्रांची माहिती...

 
बुलढाणा (प्रतिनिधी): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. साखरेची पातळी कमालीची खाली आली आहे. किडनीवर मोठा परिणाम झाला आहे.शरीरात इन्फेक्शन खूप वाढलंय.. पांढऱ्या पेशी खूप वाढल्यात..पुढील काही तास उपोषण सुरूच राहिले तर त्यांना "हायपोग्लासेमिया" होऊन कोमात जाण्याची शक्यता आहे असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान परिस्थिती एवढी गंभीर होऊनही सरकार दखल घ्यायला तयार नसल्याने रविकांत तुपकरांच्या मनात आता वेगळंच काही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी सोमठाणा येथील अन्नत्याग आंदोलनात देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती,त्यावेळी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवत ते हजारो शेतकऱ्यांसह मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईत धडकले होते. आता देखील थेट सरकारच्या दारात जाण्याच्या विचार करु शकतात .त्यामुळे अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवत ते कोणत्याही क्षणी मुंबईसाठी रवाना होऊ शकतात अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.

 १५ जूनपासून सुरू झालेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता पाचवा दिवस उजाडत आहे. रविकांत तुपकर यांची तब्येत आता प्रचंड खालावली असल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक झाले आहेत.राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलने होत आहेत. मात्र एवढे होऊनही सरकार कडून अद्याप आवश्यक तो तोडगा निघालेला नाही. रविकांत तुपकर यांच्या कुटुंबीयांसह समर्थक आणि शेतकऱ्यांना आता तुपकर यांच्या तब्येतीची चिंता वाटत आहे. मात्र अन्नाचा कणही घेणार नसल्याच्या भूमिकेवर तुपकर ठाम आहेत. दरम्यान हे आंदोलन आता थेट राज्याच्या राजधानीतच करण्याचा विचार रविकांत तुपकर यांच्याकडून सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. हजारो शेतकऱ्यांना घेऊन रविकांत तुपकर कोणत्याही क्षणी मुंबईसाठी निघू शकतात. मुंबईत मंत्रालयासमोरच ठिय्या मांडत किंवा वेगळ्या पद्धतीने अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवल्या जाईल अशी शक्यता आहे.