BIG NEWS! शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीचा दुसरा दिवस; २६ पैकी १६ उमेदवार बाद, तरीही विजयाचा गुलाल कुणाच्या नशिबी? किरण सरनाईक आघाडीवर,
श्रीकांत देशपांडे दुसऱ्या तर आदिती पोहरे तिसऱ्या स्थानी; बुलढाण्याच्या देवकर, लहानेंच्या आशा मावळल्या!
पहिल्या पसंतीत सरनाईक आघाडीवर; पोहरे आणि देशपांडे यांच्यात चुरस
२३ ऑक्टोबर रोजी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले होते. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण करण्यात आली. एकूण ३२ हजार २६६ मते वैध ठरली असून, विजयासाठी १६ हजार १४३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना ८ हजार १६२ मते मिळाली. काँग्रेसच्या आदिती पोहरे यांनी ४ हजार ६८८ मते मिळवत दुसरे स्थान पटकावले, तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ४ हजार ६६८ मते मिळाली. पोहरे आणि देशपांडे यांच्यातील मतांचा फरक अवघा २० मतांचा असल्याने पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये या दोघांमध्ये जवळची लढत पाहायला मिळाली. बुलढाण्यातील उमेदवार सुरेश देवकर यांना ३ हजार २३६ मते मिळाली, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय लहाने यांना २ हजार १५५ मते मिळाली.
रात्री साडेदहा वाजता पहिल्या पसंतींच्या मतांची मोजणी संपली; दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला वेग
पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता पूर्ण झाली. मात्र, कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला १६ हजार १४३ मतांचा कोटा गाठता आला नाही. त्यामुळे निवडणुकीचा निकाल निश्चित करण्यासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत कमी मते मिळवणारे उमेदवार नियमानुसार बाद केले जात असून, त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते पात्र उमेदवारांकडे वर्ग केली जात आहेत. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मिळालेली आघाडी अंतिम विजयासाठी पुरेशी ठरेलच, असे नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांकडे लागले आहे.
सकाळी आठ वाजेपर्यंत १६ उमेदवार बाद; आता दहा उमेदवार मैदानात
२८ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेत एकूण १६ उमेदवार बाद झाले आहेत. सुरुवातीला २६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १६ उमेदवार बाद झाल्याने आता दहा उमेदवार शिल्लक आहेत.
मतमोजणीच्या या टप्प्यावर किरण सरनाईक आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांची प्रक्रिया सुरू असल्याने अंतिम मतसंख्या आणि विजयाचा कोटा गाठण्यासाठी आवश्यक असलेली मते यांचा ताळमेळ महत्त्वाचा ठरणार आहे.
बुलढाण्यातील देवकर, लहाने यांच्या आशा मावळल्या.
या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील सुरेश देवकर आणि दत्तात्रय लहाने या दोन्ही उमेदवारांकडे जिल्ह्यातील शिक्षक मतदारांचे लक्ष लागले होते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये देवकर यांना ३ हजार २३६, तर लहाने यांना २ हजार १५५ मते मिळाली. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे त्यांना आघाडी मिळवता आली नाही.
आता दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत त्यांना किती मते मिळतात आणि त्याचा निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र देवकर आणि लहाने यांचा किरण सरनाईक यांच्यापेक्षा आकडेवारीत खूप मागे पडले आहेत.त्यामुळे जवळपास त्यांच्या आशा मावळल्या आहेत.
निकालासाठी प्रतीक्षा कायम; अंतिम कोट्याची उत्सुकता
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये किरण सरनाईक आघाडीवर असले, तरी विजयाचा आवश्यक कोटा पूर्ण झालेला नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असल्याने अंतिम निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.२६ उमेदवारांपासून सुरू झालेली ही लढत आता दहा उमेदवारांपर्यंत आली आहे. त्यामुळे पुढील मतमोजणीत कोणाला किती मते मिळतात, कोण विजयाचा कोटा पूर्ण करतो आणि विधान परिषदेच्या या निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष लागले आहे.