मोठी बातमी! बुलढाणा जिल्ह्यात खामगावला होणार नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय! डोणगाव, साखरखेर्डा, लाखनवाडा येथे होणार अप्पर तहसील कार्यालय..! खामगाव जिल्हा निर्मितीला चालना?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रशासनाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण झाले की सर्वसामान्यांची कामे लवकर होतात..कामांना वेगही येतो. म्हणूनच सध्या प्रशासकीय कामांच्या विकेंद्रीकरणावर राज्य आणि केंद्र शासनाचा भर आहे. याचाच एक भाग म्हणून आता बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासन रचनेत बदल होतो आहे. खामगाव येथे स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्यामुळे जमीन व्यवहार, महसूल अपील, आपत्ती व्यवस्थापन, अधिग्रहण यासारखे महत्त्वाचे निर्णय स्थानिक पातळीवरच घेता येणार आहेत. शासनाचा हा निर्णय अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या खामगाव जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे उचललेले सकारात्मक पाऊल समजल्या जात आहे.

 खामगाबाद प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय उभे राहिल्याने जिल्ह्यात दुहेरी प्रशासन केंद्र अस्तित्वात येणार आहे.२ एप्रिल २०२६ ला घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील महसूल यंत्रणेची नव्याने मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश मोठ्या जिल्ह्यांमध्ये करून प्रशासन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या रचनेमुळे बुलढाण्यातील प्रशासकीय ताण कमी होईल आणि खामगाव दुसरे प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित होणार आहे. 
  
 याचबरोबर तीन मोठ्या तालुक्यांच्या ठिकाणी नवे अप्पर तहसील कार्यालय देखील सुरू होणार आहे. त्यामुळे मेहकर तालुक्यातील डोणगाव, सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि खामगाव तालुक्यातील लाखनवाडा यांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत छोट्या छोट्या कामांसाठी या भागातील नागरिकांना दूरवरच्या तालुका केंद्रावर जावे लागायचे, आता मात्र जवळच्या अप्पर तहसील कार्यालयात ही कामे होणार आहेत.
दरम्यान नव्या कार्यालयातील पदभरती संदर्भातही शासनाने स्पष्टपणे आदेश दिले आहेत. त्यानुसार खामगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात १३ आणि प्रस्तावित तीनही अप्पर तहसील कार्यालयात प्रत्येकी ७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. वाहन चालक व अन्य पदे टप्प्याटप्प्याने बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.