मोठी बातमी! जिल्ह्यात ३ जूनपर्यंत ड्रोन साठी "नो - फ्लाय झोन"! राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश! लग्नातही नका उडवू ड्रोन....
May 21, 2025, 08:23 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात काही असामाजिक तत्वांकडून ड्रोन अथवा मानवरहित हवाई यंत्रांचा (UAV) गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता ३ जून २०२५ पर्यंत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश काढला आहे. यानुसार कोणत्याही व्यक्तीस या कालावधीत ड्रोन उडवता, वापरता किंवा चालवता येणार नाही.
जर कोणतीही व्यक्ती हा आदेश पाळणार नाही, तर तिच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. आपल्या सुरक्षेसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले असून, प्रशासनास सहकार्य करून या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विवाहसोहळ्यांना फटका....
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून अनेक विवाह सोहळ्यांमध्ये वधू-वरांच्या वेडिंग शूटसाठी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ३ जून २०२५ पर्यंत कोणत्याही प्रकारचा ड्रोन वापर निषिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे विवाह समारंभात देखील ड्रोन वापरणे कायद्याच्या विरोधात ठरेल. परवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास संबंधित व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाऊ शकते, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः विवाह आयोजक व छायाचित्रकारांनी आदेशाची गंभीर दखल घेऊन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.