BIG BREAKING : तोडगा निघणार का? संकटमोचक गिरीश महाजन रविकांत तुपकरांच्या आंदोलनस्थळी दाखल; राज्यभर पेटलेल्या आंदोलनाकडे सरकारची अखेर दखल!

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून राज्यभर उग्र होत चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे तब्येत खालावत चाललेल्या तुपकरांच्या आंदोलनाबाबत अखेर काही तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 बुलढाणा

सरसकट, विना अट-विना शर्ती कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा या प्रमुख मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस उजाडला असताना त्यांच्या प्रकृतीची चिंता अधिक वाढली आहे. दुसरीकडे शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने राज्यभरातील शेतकरी संतप्त झाले असून आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक आक्रमक स्वरूप प्राप्त होत आहे.

 

आज सकाळपासूनच आंदोलनाची तीव्रता स्पष्टपणे दिसून आली. देऊळगाव मही येथे शंभर टक्के बंद पाळण्यात आला. व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व व्यवहार ठप्प ठेवले. चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथे शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "सरसकट कर्जमुक्ती द्या", "पीकविमा मंजूर करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 

दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी येथे संतप्त शेतकरी आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्गावर उतरून रास्तारोको आंदोलन केले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना रोखले. काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यभरात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलेला असतानाच आता मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी पोहोचल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तुपकर यांच्या प्रकृतीची झपाट्याने खालावत चाललेली स्थिती, गावोगावी सुरू असलेली आंदोलने, बंद, रास्तारोको आणि समृद्धी महामार्ग रोखण्यापर्यंत गेलेला संघर्ष यामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.

गिरीश महाजन आणि रविकांत तुपकर यांच्यातील चर्चेतून काही सकारात्मक निर्णय होतो का, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार कोणती भूमिका घेते आणि पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा अखेर मार्ग निघतो का, याकडे आता राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

(अपडेट : गिरीश महाजन आणि रविकांत तुपकर यांच्यातील चर्चेचा तपशील समोर आल्यानंतर पुढील घडामोडी स्पष्ट होणार आहेत.)