BIG BREAKING : तुपकरांचा इशारा ठरला वादळापूर्वीची चाहूल! नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रुद्रावतार; श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्सच्या कार्यालयांची तोडफोड!
सक्तीच्या वसुलीविरोधातील संतापाचा भडका; आता पुढे काय? नांदेडची ठिणगी राज्यभर पेटणार? महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा भडकण्याची शक्यता!
“शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्ती वसुली कराल, महिलांना त्रास द्याल, तर कपडे काढून फटके देऊ! सरकारने वेळीच आवरावे, अन्यथा एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही!” असा अत्यंत कडक इशारा रविकांत तुपकर यांनी यापूर्वी दिला होता. त्या इशाऱ्यानंतर नांदेडमध्ये घडलेल्या तोडफोडीच्या घटनेने संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. तुपकरांचा इशारा आता केवळ भाषणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांचा संताप प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होऊ लागल्याचे या घटनेतून दिसत आहे.
दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूने पेटला संताप; तुपकरांनी आधीच दिला होता निर्वाणीचा इशारा!
नांदेड येथील चंद्रकांत शिंदे आणि लातूर येथील दत्तात्रय कुंभार या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीचा दबाव असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या दोन्ही घटनांमुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला होता. रविकांत तुपकर यांनी संबंधित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यानंतर त्यांनी खासगी फायनान्स कंपन्या, मायक्रोफायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांच्या कथित दडपशाहीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटले, हातात पैसा नाही, कर्जाचा डोंगर वाढतो आहे आणि अशा परिस्थितीत वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तुपकरांनी केला होता. सरकारने या प्रकारांना तातडीने लगाम घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
नांदेडमध्ये संतापाचा स्फोट! फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांना लक्ष्य...
दरम्यान, आज नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्सच्या कार्यालयांची तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले. या घटनेमुळे खासगी कर्जवसुलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी आणि फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतींविरोधात निर्माण झालेला असंतोष किती टोकाला पोहोचला आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
आता पुढे काय? नांदेडनंतर राज्यभर आंदोलनाचा भडका उडणार?
नांदेडमधील घटनेनंतर आता सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे पुढे काय? रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटना राज्यभरातील मायक्रोफायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्यांविरोधात आंदोलन अधिक तीव्र करणार का? नांदेडमधील घटनेचे पडसाद इतर जिल्ह्यांत उमटणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बुलढाणा, नांदेड, लातूरसह दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कर्जवसुलीच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांविरोधातील संताप संघटित आंदोलनात रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.