BIG BREAKING : जिल्हा बँकेवर ‘छत्री’ची जोरदार सावली! ९ पैकी ७ जागांवर सहकार पॅनलचा झेंडा, ‘ट्रॅक्टर’ला अवघ्या २ जागा;
२१ पैकी १९ जागांसह सत्ता पुन्हा शिंगणे-जाधवांच्या हातात! ज्यासाठी आमदार मनोज कायदेंनी केला अट्टाहास, तिथे निराशा....
‘छत्री’ची जोरदार सरशी; ८ पैकी ७ उमेदवार विजयी!
सहकार पॅनलची निशाणी ‘छत्री’, तर स्व. अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनलची निशाणी ‘ट्रॅक्टर’ होती. निवडणूक झालेल्या ९ जागांपैकी सहकार पॅनलने ८ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी तब्बल ७ उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे शेतकरी परिवर्तन पॅनलने ७ जागांवर उमेदवार दिले; मात्र त्यातील केवळ २ उमेदवार विजयी ठरले.
सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये—
* इतर सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघ — सुनील राजाराम उदयकर
* इतर मागास वर्ग राखीव मतदारसंघ — गोविंदराव गणपत मिरगे
* प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, संग्रामपूर — श्रीकांत दादाराव मारोडे
* महिला राखीव मतदारसंघ — पुष्पाबाई रामदास बारवकर
* महिला राखीव मतदारसंघ — अस्मिता प्रदीप हेलगे
* अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ — संजय भास्करराव रायमुलकर
* प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, लोणार — गोविंद शेषराव मापारी
यांचा समावेश आहे.
तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे—
* नागरी सहकारी बँका/वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ — ज्ञानेश्वर पाटील
* सोसायटी मतदारसंघ, मलकापूर — शिवचंद्र तायडे
हे दोन उमेदवार विजयी झाले.
२१ पैकी १९ जागा; सहकारचा एकतर्फी विजय!
या निवडणुकीत एकूण २१ संचालकपदांसाठी प्रक्रिया पार पडली. त्यापैकी तब्बल १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. या १२ जागांवरही सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीसाठी उरलेल्या ९ जागांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.या ९ जागांच्या निकालातही सहकार पॅनलने ७ जागा जिंकल्याने अंतिम आकडा सहकार पॅनल १९ विरुद्ध शेतकरी परिवर्तन पॅनल २ असा झाला आहे.म्हणजेच निवडणूक झालेल्या जागांमध्येही सहकार पॅनलने जवळपास ७८ टक्के जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे हा केवळ विजय नसून जिल्हा बँकेवरील सहकार पॅनलच्या संघटनात्मक पकडीवर शिक्कामोर्तब करणारा निकाल मानला जात आहे.
शिंगणे-जाधवांच्या नेतृत्वावर मतदारांची मोहर?
सहकार पॅनलच्या या विजयामागे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे दोन्ही नेते आधीच बिनविरोध निवडून आले असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या सहकार पॅनलने निवडणुकीच्या ९ जागांपैकी ७ जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली.त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा सहकार पॅनलच्या हातात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘अजितदादांनी जिल्हा बँकेला पुनर्जीवन दिले’ हा मुद्दा चालला नाही?
दुसरीकडे स्व. अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून प्रस्थापित सहकार पॅनलला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जिल्हा बँकेला स्व. अजितदादा पवार यांनी पुनर्जीवन दिल्याचा मुद्दा पुढे करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी या निवडणुकीत वेगळे राजकीय समीकरण उभे करण्याचा प्रयत्न केला.
मात्र मतदारांनी या प्रयत्नाला अपेक्षित प्रतिसाद दिलेला दिसत नाही. कारण शेतकरी परिवर्तन पॅनलला ७ जागांपैकी केवळ २ जागा मिळाल्या.यातील आणखी एक महत्त्वाचा राजकीय संदेश म्हणजे ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी जिल्हा बँकेत पोहोचावा यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी जोर लावला, त्याच पॅनलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उमेदवार मनोज दांडगे यांचा पराभव झाला. त्यामुळे या निकालाकडे राजकीयदृष्ट्याही वेगळ्या अर्थाने पाहिले जात आहे.
ट्रॅक्टरच्या दोन जागा... पण दोन्ही उमेदवारांचे राजकीय रंग वेगळे!
शेतकरी परिवर्तन पॅनलच्या विजयी दोन उमेदवारांकडे पाहिले तर आणखी एक राजकीय चित्र समोर येते.शिवचंद्र तायडे हे राजकीय जीवनात भाजपशी संबंधित, तर ज्ञानेश्वर पाटील हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. त्यामुळे शेतकरी परिवर्तन पॅनलच्या दोन जागांवरील विजयाचे राजकीय श्रेय एकाच पक्षाला देता येणार नाही.
याउलट सहकार पॅनलने विविध मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करून संघटनात्मक ताकद आणि मतदारांशी असलेला संपर्क याच्या जोरावर मोठा विजय मिळवला.
२१ पैकी १९ जागा सहकार पॅनलकडे आणि केवळ २ जागा शेतकरी परिवर्तन पॅनलकडे!
निवडणुकीपूर्वी प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान देत उभे राहिलेले शेतकरी परिवर्तन पॅनल काही मतदारसंघांत प्रभाव दाखवू शकले असले, तरी संपूर्ण जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित बदलण्याइतपत ते यशस्वी ठरलेले नाही.विशेष म्हणजे निवडणूक झालेल्या ९ जागांमध्येही ८ जागांवर उमेदवार देणाऱ्या सहकार पॅनलने ७ जागा जिंकल्या, तर ७ जागांवर लढणाऱ्या परिवर्तन पॅनलला फक्त २ जागा मिळाल्या.त्यामुळे बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा हा निकाल केवळ उमेदवारांच्या विजय-पराभवाचा नसून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सध्याच्या राजकीय शक्तींचे स्पष्ट प्रतिबिंब ठरला आहे.