BIG BREAKING मेहकरात अग्नितांडव! नगरपरिषद कार्यालय पेटले; रेकॉर्ड रूम जळून खाक! आज पहाटेची घटना! ३ वर्षाआधी पेटले होते एसडीओ कार्यालय...
Updated: May 3, 2025, 08:28 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर नगर परिषदेची अतिक्रमण विरोधी कारवाई चर्चेत असतानाच आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मेहकर नगरपरिषद कार्यालयाला आज ,३ मेच्या पहाटे भीषण आग लागली. या आगीत नगर परिषदेची रेकॉर्ड रूम जळून खाक झाली आहे.
मेहकर नगरपरिषद कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. दरम्यान आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास रेकॉर्ड रूमला आग लागली. या आगीत नगर परिषदेशी संबंधित अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहे. शॉट सर्किटने ही आग लागल्याचे सांगितल्या जात असले तरी आगीचे अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही. स्थानिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आग नियंत्रणात येत नव्हती. मेहकर नगरपालिकेच्या अग्निशामक वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन दुरुस्तीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे लोणार नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रूम मधील सर्वच महत्वाची कागदपत्रे स्वाहा झालेली आहेत. याआधी ३१ मार्च २०२२ रोजी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देखील आग लागली होती. त्यावेळी देखील सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळालेली होती. आता नगरपरिषद कार्यालयातील रेकॉर्ड रूम जळाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.