BIG BREAKING: क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांच्या नाकात आणला दम; मंत्रालयासमोरील झाडावर गळ्यात फास अडकवून ठिय्या, दोन तासांपासून अख्खी यंत्रणा हैराण!
आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना स्पष्ट इशारा दिला आहे की, जबरदस्तीने पकडण्याचा किंवा खाली उतरवण्याचा प्रयत्न झाल्यास गळफास घेऊन झाडावरून उडी मारू. या इशाऱ्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी सातत्याने प्रयत्न करत आहेत; मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रशासनाची मोठी कसोटी लागली आहे.
घटनास्थळी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलीस, मुंबई महानगरपालिकेची अग्निशामक यंत्रणा आणि शेकडो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. झाडावरून आंदोलनकर्त्यांना सुरक्षित खाली आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असले तरी अद्याप त्याला यश आलेले नाही. मंत्रालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसरावर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष केंद्रित आहे.दुसरीकडे, विधानभवनासमोर सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आणि इतर शेतकरी मागण्यांसाठी आक्रमक आंदोलन करणारे रविकांत तुपकर यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शंभरावर कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. मात्र, तुपकरांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, मंत्रालयासमोरील झाडावरील आंदोलनामुळे अख्खी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा हैराण झाली आहे.