BIG BREAKING युवा शेतकऱ्याची आत्महत्या; खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी केले होते डिसेंबर मध्ये उपोषण!
दोन महिने उलटूनही शासनाने निर्णय न घेतल्याने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोट मध्ये नमूद..! गावकरी आक्रमक; स्व. कैलास नागरे यांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही...
Mar 13, 2025, 11:06 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून पाणी मिळावे यासाठी लढा उभारणाऱ्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाइड नोट सापडली असून जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळेच शासनाच्या धोरणाला वैतागून आत्महत्या करत असल्याचे कैलास नागरे यांनी म्हटले आहे. पंचक्रोशीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात ७ दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिल्याने कैलास नागरे यांनी उपोषण सोडले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता न केल्याने २६ जानेवारी रोजी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भूमिका कैलास नागरे यांनी घेतली होती. मात्र त्यावेळी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने कैलास नागरे यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र दोन महिने उलटूनही शासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने पाण्यासाठी झटणारे कैलास नागरे आणि विषारी औषध प्राशन करून घेऊन आत्महत्या केली आहे.
कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. ही चिठ्ठी बुलडाणा लाइव्ह च्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत कैलास नागरे यांनी शासनाच्या उदासीन धोरणाबद्दल खंत व्यक्त केली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस पोहचले असून पोलिसांनी पंचनामा केला आहे. मात्र जोपर्यंत कैलास नागरे यांच्या मागण्या संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम करू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.