पीक पाहणीसाठी पैसे मागितले तर सावधान! शेतकऱ्यांनी एक रुपयाही देऊ नये; थेट बँक खात्यात मिळते मानधन..पैसे मागितले बिनधास्त करा तक्रार...
पीक पाहणीच्या कामासाठी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यकांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्यामुळे “पीक पाहणी करून देण्यासाठी पैसे द्या” अशी मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीक पाहणीसाठी शासनाकडून किती मानधन?
शासनाकडून पीक पाहणीसाठी नियुक्त सहाय्यकांना निर्धारित दरानुसार मानधन देण्यात येते. निःमिश्र पिकाच्या पाहणीसाठी प्रति प्लॉट १० रुपये, तर मिश्र पिकाच्या पाहणीसाठी प्रति प्लॉट १२ रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. हे मानधन संबंधित सहाय्यकांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
त्यामुळे पीक पाहणीच्या बदल्यात शेतकऱ्यांकडून थेट पैसे घेण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या व्यक्तीने अशा कामासाठी पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी त्याला पैसे देऊ नयेत.
पीक पाहणीचा शासनाला काय उपयोग?
पीक पाहणीमध्ये नोंद झाल्यामुळे प्रत्यक्ष शेतातील पिकांची स्थिती आणि त्याचे क्षेत्र याबाबतची माहिती शासनाला उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे कृषी क्षेत्राचे नियोजन, पिकांचे क्षेत्रफळ निश्चित करणे तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे अधिक सुलभ होते.त्यामुळे पीक पाहणीची नोंद अचूक होणे शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचे आहे.
पैसे मागितल्यास थेट तक्रार करा!
पीक पाहणी करणाऱ्या व्यक्तीची ओळख निश्चित केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती द्यावी. पाहणीच्या बदल्यात पैसे, शुल्क किंवा अन्य कोणतेही आर्थिक मोबदले मागितल्यास रक्कम देऊ नये. अशा प्रकारची मागणी झाल्यास संबंधित महसूल अथवा भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि पैशांची मागणी करणाऱ्यांची माहिती संबंधित प्रशासनाला द्यावी.