सावधगीरी! धोकादायक इमारतींचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण! मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जीर्ण इमारतींच्या मालकांना बजावल्या नोटीसा....
Jun 2, 2025, 11:31 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून, अशा इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय, नदीपात्रात किंवा नदीच्या काठावर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा ठिकाणी राहणाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानांतर करण्याचे आवाहन केले.
गेल्यावर्षी मलकापूर तालुक्यातील दाताळा परिसरात अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन अधिक सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियंत्रण कक्षासह संपूर्ण यंत्रणा अद्ययावत केली असून, संभाव्य धोके लक्षात घेऊन सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत.