बँकांनी भोगवटदार वर्ग २ जमीनधारक शेतकऱ्यांना पीककर्ज, तारणकर्ज वाटपात दिरंगाई करू नये! जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे बँकांना स्पष्ट निर्देश; दिरंगाई, टाळाटाळ केल्यास कारवाईचा इशारा..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भोगवटदार वर्ग २ ची शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज तसेच शेती विकासासाठी आवश्यक मध्यम व दीर्घ मुदतीचे तारणकर्ज कोणत्याही अडचणीशिवाय उपलब्ध करून द्यावे. या प्रक्रियेत दिरंगाई अथवा टाळाटाळ झाल्यास संबंधित बँकांवर प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी परिपत्रक जारी केले आहे.

भोगवटदार वर्ग-२ जमीनधारकांना बँका व वित्तीय संस्थांकडून तारणकर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने हे परिपत्रक काढण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६(४) नुसार अशा भोगवटदारांना सहकारी बँका, भू-विकास बँक, भारतीय स्टेट बँक, तत्सम बँका किंवा महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ यांच्याकडून जमिनीच्या तारणावर कर्ज घेता येते.
महत्त्वाचे म्हणजे, यासाठी जिल्हाधिकारी किंवा शासनाची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अपयश आल्यास तारण ठेवलेल्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचे अधिकार संबंधित बँका व वित्तीय संस्थांना कायद्यानुसार प्रदान केलेले आहेत.
"भोगवटदार वर्ग २ शेतकऱ्यांना पीककर्ज व तारणकर्ज वाटपात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. दिरंगाई करणाऱ्या बँकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिला आहे.