तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसणार नाही! बुलडाण्यातील हिंदूंच्या आक्रोश मोर्चात सुभाष लोहे यांचे प्रतिपादन;स्वामी अमोलानंद महाराज म्हणाले, केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा..;
बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज एकवटला..
Updated: Dec 11, 2024, 09:35 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी..हातात भगवे झेंडे, बांग्लादेशच्या निषेधाचे फलक.. भारत माता की जय, जय श्री राम, बांग्लादेश मुर्दाबादच्या गगनभेदी भेदी घोषणा..हे चित्र होते काल,१० डिसेंबरला बुलडाण्यात झालेल्या सकल हिंदू समाजाच्या आक्रोश – न्याय मोर्चाचे..! बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाने या मोर्चाचे आयोजन केले होते, या मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, बौद्ध भिक्खू आणि ख्रिश्चन धर्मगुरूंनी देखील या मोर्चाला उपस्थिती लावली. बुलडाणा शहरातील गर्दे सभागृहातून या मोर्चाला सुरुवात झाली.त्यानंतर हा मोर्चा तहसील चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संत विचार विमर्श प्रमुख सुभाषजी लोहे, स्वामी अमोलानंद महाराज यांनी संबोधित केले. बांग्लादेशने वेळीच स्वतःच्या कृत्यावर आवर घालावा. देशातील अल्पसंख्यांकांवरील हल्ले थांबवावे अन्यथा भारतातील हिंदू समाजानेव मनावर घेतले तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसणार नाही असे ते म्हणाले..
यावेळी पुढे बोलतांना सुभाषजी लोहे म्हणाले की, बांग्लादेशला मुक्ती मिळाली तेव्हा तेव्हाची हिंदूंची जनसंख्या आणि आताची हिंदूंची जनसंख्या यात मोठी तफावत आहे. या हिंदूचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला. हिंदू घटा देश बटा हीच वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. जातीपातींमध्ये विभागलेला हिंदू समाज एकवटला तर हिंदूंमध्ये कुणीही फूट पाडू शकणार नाही असेही ते म्हणाले. बांग्लादेशाला भारतामुळे स्वातंत्र्य मिळाले मात्र बांग्लादेश उपकार विसरला असेही ते म्हणाले.
स्वामी अमोलनंद महाराज म्हणाले की, भारतात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून अल्पसंख्यांक समाज सुरक्षित आहेत. मात्र जिथे जिथे हिंदू अल्पसंख्यांक झाले तिथे तिथे हिंदूंना संपवण्याचे प्रयत्न झाले. बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार तातडीने थांबले पाहिजेत यासाठी काय करायचे ते केंद्र सरकारने तातडीने करावे, प्रसंगी बांग्लादेशात सैन्य घुसवावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. प्रास्ताविक पत्रकार कृष्णा सपकाळ यांनी केले..