दणका! बुलडाणा शहरातील ८ खाजगी दवाखाने बंद होणार? नगरपालिकेची नोटीस! आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे भोवले..."या" दवाखान्यांचा समावेश..!
Jan 8, 2025, 09:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील आठ खाजगी दवाखान्यांना बुलदाणा नगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. पुढच्या 7 दिवसांत दवाखान्याच्या इमारत खाली करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या आहेत. फायर ऑडिट न करणे, दवाखान्यात पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे हॉस्पिटलच्या संचालकांच्या अंगलट आले आहे...
बुलडाणा शहरात मोठ्या संख्येत खाजगी दवाखाने आहेत. शहरातील ७० पेक्षा अधिक दवाखान्यात रुग्णांना भरती करण्याची व्यवस्था आहे. दरम्यान खाजगी दवाखान्यांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. मात्र अनेक दवाखान्यांच्या संचालकांचे याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या सूचनेवरून नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाने शहरातील आठ दवाखान्यांना नोटीस दिलेली आहे.
राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी दवाखान्यांना आग लागून पेशंटचा मृत्यू झाल्याचे उदाहरणे आहेत. अशा स्थितीत बुलढाणा नगर परिषदेच्या वतीने शहरातील हॉस्पिटल्स ना आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र वारंवार निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने नगरपरिषदेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील ८ हॉस्पिटल्स पुढील 7 दिवसात खाली करावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या यादीत प्रतिष्ठित समजले जाणारे हॉस्पिटल आहेत. ज्यात जाधव पल्स हॉस्पिटल, उकार्डे हॉस्पिटल, मेहेर हॉस्पिटल्स, सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाघ हॉस्पिटल्स, ममता हॉस्पिटल्स, चाटे हॉस्पिटल्स आणि धन्वंतरी हॉस्पिटल यांचा समावेश आहे..