

औरंग्याच्या कबरी विरोधात बजरंग दल मैदानात! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ कबर हटवण्याची मागणी; नाहीतर उखडून फेकणार...
Updated: Mar 17, 2025, 13:35 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): औरंग्याची कबर उखडून फेकावी यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद मैदानात उतरले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे, त्यानिमित्ताने बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात औरंग्याची कबर उखडून फेकण्यासाठी आंदोलन करण्यात आले. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील बजरंग दलाच्या वतीने औरंग्याची कबर उखडून फेकावी या मागणीसाठी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
औरंगजेब हा क्रूरकर्मा होता. स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नेस्तनाभूत करण्यासाठी औरंग्याने अनेक कटकारस्थाने रचली. मात्र अशा क्रूर औरंगजेबाचा पुळका महाराष्ट्रात काही जणांना आलेला आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरू आहे हे निषेधार्य असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री माधव धुंदाळे माध्यमांशी बोलताना म्हणाले. सरकारने यावर निर्णय घेतला नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने कारसेवा करू असा इशाराही त्यांनी दिला..