गुजरातच्या महापुरात बस अडकली, ४० प्रवाशांचे जीव टांगणीला... एका फोननंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सरसावले; हेलिकॉप्टरने थरारक रेस्क्यू!
या प्रवाशांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील हितेश दलिचंद पडधरिया, पत्नी मानसी पडधरिया आणि तीन वर्षांची मुलगी थिविजा यांचाही समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, हितेश पडधरिया हे पत्नी व मुलीसह वापी येथे अभियंता असलेल्या नातेवाईक जीत पडधरिया यांना भेटून ट्रॅव्हल्स बसने नाशिकमार्गे परत येत होते. वापीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावरील आंबेठी-कोरली परिसरात नदीला अचानक पूर आल्याने रस्ता पूर्णपणे जलमय झाला. काही क्षणांतच पुराचे पाणी बसपर्यंत पोहोचले आणि बस चारही बाजूंनी पाण्यात अडकली.
परिस्थिती गंभीर होताच सर्व ४० प्रवाशांनी बसच्या छतावर धाव घेतली. वाढते पाणी आणि मदतीचा कोणताही मार्ग नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी हितेश पडधरिया यांनी भ्रमणध्वनीवरून जानेफळ येथील राजू पडधरिया यांच्याशी संपर्क साधत मदतीची आर्त हाक दिली.
यानंतर राजू पडधरिया यांनी कृष्णा हावरे, हिम्मतराव आवले तसेच जानेफळचे ठाणेदार शरद माळी यांना माहिती दिली. ठाणेदार माळी यांनी तातडीने ही बाब माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या निदर्शनास आणून दिली. रायमुलकर यांनी विलंब न लावता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवली.
घटनेचे गांभीर्य ओळखत प्रतापराव जाधव यांनी तातडीने गुजरातमधील आपत्कालीन बचाव यंत्रणेशी संपर्क साधला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर बचाव मोहिमेला वेग आला आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्व ४० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्वांना सुरक्षितस्थळी हलवून पुढील प्रवासाचीही व्यवस्था करण्यात आली.या बसमधील सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती असून, सुखरूप सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, बचाव पथक आणि संबंधित प्रशासनाचे मनापासून आभार मानले.
संकटाच्या क्षणी लोकप्रतिनिधीने किती तत्परतेने आणि संवेदनशीलतेने काम करावे, याचा प्रत्यय या घटनेतून आला. वेळेवर झालेला समन्वय आणि तातडीची हालचाल यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.