मोबाइल नंबर मागणं पडले महागात! तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीस दंड व कारावास...
ही घटना १२ मार्च २०१८ रोजी नगरपरिषद कार्यालयाजवळ घडली. आरोपी आठवडी बाजारात केळीची गाडी लावत असताना शेजारी भाजी विकणाऱ्या महिलेच्या मुलीचा मोबाइल क्रमांक मागितला. मुलीने नकार दिल्यावर आरोपीने अश्लील शिवीगाळ करत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी महिलेने हस्तक्षेप केल्यावर आरोपीने दगड मारून तिच्या डोक्यात गंभीर जखम केली. शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीचाही उल्लेख तक्रारीत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध धोकादायक साधनाने दुखापत करणे, अश्लील शब्द वापरणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. सरकार पक्षातर्फे न्यायालयात चार साक्षीदार पुरविण्यात आले—फिर्यादी महिला, जखमी मुलगी, प्रत्यक्षदर्शी आणि तपास अधिकारी. सर्व साक्षी आणि वैद्यकीय पुरावे भक्कम असल्याचे न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले.
मुख्य न्यायदंडाधिकारी खंडाळे यांनी आरोपीला ३,००० रुपये दंड, कोर्ट उठेपर्यंत कारावास, तसेच दंड न भरल्यास १० दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय डोंगरदिवे यांनी पूर्ण केला, तर खटल्याची पैरवी हेडकॉन्स्टेबल गजानन मांटे यांनी केली. सरकारी वकील हितेश रहाटे यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीचा दोष सिद्ध केला.
