रायपूरमध्ये अशोक विजयादशमीचा उत्साह! बौद्ध अनुयायांची भव्य धम्मरॅली; बुद्ध वंदना अन् २२ प्रतिज्ञांचा सामूहिक सोहळा उत्साहात!
महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुलढाणा जिल्हा सल्लागार दत्ताभाऊ शिरसाठ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पूर्णाबाई खिल्लारे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन करताना योगेश खिल्लारे यांनी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसरा यांतील ऐतिहासिक व वैचारिक फरक अभ्यासपूर्ण पद्धतीने स्पष्ट केला.
अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे जाण्याचा संदेश
यावेळी उपस्थित बौद्ध उपासक-उपासिकांना संबोधित करताना दत्ताभाऊ शिरसाठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विचारांची सविस्तर मांडणी केली. ते म्हणाले, “ही केवळ विचारांची लढाई नसून आत्मसन्मानाची लढाई आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि चमत्काराकडून विवेक व विज्ञानाकडे जाण्याचा प्रेरणादायी संदेश देतो.”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि विचार प्रत्येकाने दैनंदिन जीवनात अंगीकारावेत. समाजातील घातक रूढी-परंपरांचा त्याग करून विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दिल्ली ते नेपाळ बौद्धधम्म सहलीची माहिती
कार्यक्रमादरम्यान सिद्धेश्वर यात्रा कंपनी, कोलारा यांच्या वतीने घेवंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या ‘दिल्ली ते नेपाळ बौद्धधम्म सहली’ची माहिती देण्यात आली. ही सहल १२ डिसेंबर रोजी रायपूर येथून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. या ऐतिहासिक आणि धार्मिक सहलीत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रेमानंद सरकटे, चिंतामन लहाने, समाधान जाधव, दत्तू लहाने, कचरू हिवाळ, प्रल्हाद खिल्लारे, साहेबराव लहाने, दिलीप लहाने, बलदेव लहाने, अशोक खिल्लारे, सुखदेव खिल्लारे, उषा सरकटे, कस्तुराबाई जाधव, मीना लहाने, पूर्णाबाई खिल्लारे, शिलाबाई हिवाळे, मंदाबाई, ज्योती लहाने आणि संगीता लहाने यांच्यासह परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका, समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून भगवान बुद्धांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यात आला.