जिल्हा बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड होताच ‘मोठ्या साहेबां’च्या स्मृतीस्थळी जालिंदर बुधवत नतमस्तक; सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे यांना केले अभिवादन...

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी सहकारमहर्षी स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे साहेब अर्थात ‘मोठ्या साहेब’ यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक होत अभिवादन केले.

बुधवत

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या वतीने जालिंदर बुधवत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ११ ऑगस्ट हा नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यांच्यासोबत निवडणूक रिंगणात असलेल्या नऊ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने बुधवत यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाली.

 

अविरोध निवडीनंतर बुधवत यांनी चिखली रोडवरील सहकारमहर्षी स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या स्मृतीस्थळी भेट देत त्यांना अभिवादन केले. सहकार क्षेत्रात भास्करराव शिंगणे यांनी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

 

‘कामाचा माणूस’ जिल्हा बँकेत पोहोचला, अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत असून, बुधवत यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील कामाला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

 

यावेळी जिल्हा समन्वयक गजानन धांडे, किसानसेना उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे, बुलढाणा तालुका प्रमुख विजय इतवारे, किरण दराडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हा बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाल्यानंतर बुधवत यांनी सर्वप्रथम सहकारमहर्षींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केल्याने त्यांच्या या कृतीची राजकीय व सहकार क्षेत्रातही चर्चा होत आहे.