बुलढाणा तालुक्यात युरीयाचा कृत्रीम तुटवडा; शेतकऱ्यांची अडचण वाढली, युवक काँग्रेसचा आंदाेलनाचा इशारा!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यात सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर युरीया खताचा तीव्र तुटवडा जाणवत असून, काही ठिकाणी खत वितरणात प्रचंड अनियमितता आणि शेतकऱ्यांवर अन्याय केल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे आधीच संकटग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे. युवक काँग्रेसच्या वतीने यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, चार दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या जिल्ह्यात मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मका पीक सध्या युरीया खत देण्याच्या टप्प्यावर आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून युरीया खताचा तुटवडा जाणवत आहे. काही कृषी केंद्र चालक मुद्दाम कृत्रिम तुटवडा निर्माण करत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी खतासोबत झिंक बॅग किंवा इतर साहित्य खरेदी करण्यास शेतकऱ्यांना सक्ती केली जात आहे. काही ठिकाणी युरीया विक्री करताना शेतकऱ्यांच्या नावावर खाते नसल्यास खत नाकारले जात आहे.
अशा प्रकारांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे, अनेक खत विक्रेत्यांनी आपल्या दुकानाबाहेर उपलब्ध खतांची माहिती देणारे फलक लावलेले नाहीत, हे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे युवक काँग्रेसने निदर्शनास आणून दिले आहे.
हुमनी हळीने साेयाबीनचे पिक उदध्वस्त
 बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचे आक्रमण झाले असून, हजारो हेक्टरवरील पिके उदध्वस्त झाली आहेत. दुबार आणि तिबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
चार दिवसांची मुदत; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
युरीया खत वितरणात पारदर्शकता आणावी, काळाबाजारी करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, तसेच हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. याबाबत चार दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर महाराष्ट प्रदेश युवक काॅंग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ता विश्वदीप पडाेळ पाटील, शिवराज पाटील, सुरज साेनाेने, संदीप बाेर्डे, सचिन मापारी आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.