नव्या वर्षांसाठी ५१९ कोटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मान्यता..! पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन समितीची बैठक;

 मार्च अखेर पर्यंत कामे मार्गी लावण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)::जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सन २०२५-२६ या नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ४००.७८ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना घटक कार्यक्रमांतर्गत १०० कोटी व आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत १८.६५ कोटी असा एकूण ५१९.४३ कोटीचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

  निवडणुकीनंतर जिल्ह्याची पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीला केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, सिद्धार्थ खरात, श्वेता महाले, मनोज कायंदे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
२०२५-२६ साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शासनाने ४००.७८ कोटी रुपये कमाल आर्थिक मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ९३६.२४ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे. राज्यस्तरीय बैठकीत ५३५.४६ कोटी रुपये वाढीव आराखड्याची मागणी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मान्यता प्रदान करण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत शासनाने १०० कोटी रुपये कमाल आर्थिक मर्यादा निश्चित केली आहे त्यानुसार अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी १६४.०२ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे. राज्यस्तरीय बैठकीत ६४.०२ कोटी रुपये वाढीव आराखड्याची मागणी करण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात आली असून हा प्रारूप आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तसेच आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत शासनाने १८.६५ कोटी रुपये कमाल आर्थिक मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ३३.९० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे. राज्यस्तरीय बैठकीत १५.२५ कोटी रुपये वाढीव आराखड्याची मागणी करण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात आली.
कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा : ना. पाटील
चालू आर्थिक वर्षासाठी
४४० आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ३९४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांसाठी राज्य शासनाकडून एकूण नियतव्ययपैकी १७६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १५१ कोटी रुपये (८५.८३ टक्के) निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी उपलब्ध करून मिळण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असून तो लवकरच प्राप्त होईल. तथापि मंजूर आराखड्यातील सर्व कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.