अन् बुलढाण्याचे कलेक्टर थेट पेट्रोल पंपावर! पुढे काय झालं?
May 23, 2026, 15:54 IST
बुलढाणा (जिमाका बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा असल्याच्या चर्चा आणि नागरिकांमधील संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी आज स्वतः ‘ॲक्शन मोड’मध्ये येत जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांना अचानक भेटी दिल्या. या आकस्मिक तपासणीदरम्यान त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्ध साठ्याची तसेच पुरवठा साखळीची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. नागरिकांना इंधन खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
गेल्या काही दिवसांत इंधन पुरवठ्याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या विविध अफवांमुळे जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय शहरातील आणि मुख्य महामार्गावरील प्रमुख पेट्रोल पंपांना भेटी दिल्या. त्यांनी थेट पंपावरील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि ‘स्टॉक रजिस्टर’ची सखोल तपासणी केली. तसेच, प्रत्यक्ष भूगर्भातील टाक्यांमध्ये (Underground Tanks) किती इंधन शिल्लक आहे, याची मोजणी करून घेण्याचे निर्देश दिले.
या तपासणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ऑईल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यात आगामी दिवसांसाठी पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याची खात्री केली. कोणत्याही पंपावर इंधनाची साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे आढळल्यास, संबंधित चालकाविरुद्ध परवाना रद्द करण्यासह कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पंपांवर गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
"जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ऑईल कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करू नये. केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे. जिल्ह्यात कुठेही इंधनाचा तुटवडा भासणार नाही," असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी यावेळी केले.
"सर्व नागरिकांना शांततेत आणि सुरळीतपणे इंधन मिळावे यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पेट्रोल पंपांवर शांतता राखावी, कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास अथवा साठेबाजीला प्रोत्साहन दिल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असा इशारा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे.