डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा! ३७० वर्षांनंतर छत्रपती शिवराय आणि गुणवंताबाईंच्या विवाहसोहळ्याच्या आठवणींना उजाळा ! हजारो वऱ्हाडीमंडळींनी केला अक्षतांचा वर्षाव!

 छत्रपतींचे वंशज ना. शिवेंद्रराजांच्या उपस्थितीने सोहळ्याला चार चांद.. आ. श्वेताताईंच्या कल्पक नियोजनाचे मान्यवरांकडून कौतुक! शिवेंद्रसिंह राजे म्हणाले, छत्रपती शिवराय नसते तर हिंदुत्व बघायला मिळाले नसते..
 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सनई चौघड्यांचा मंगल स्वर, वैदिक मंत्रोच्चाराने वातावरणात निर्माण झालेली पवित्रता, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव च्या गगनभेदी घोषणा, भव्य दिव्य मंडप, दारोदारी सडा शिंपडून काढलेल्या रांगोळ्या आणि साक्षीला दहा हजारांच्या वर वऱ्हाडी मंडळी..अशा भरगच्च आणि मंगलमय वातावरणात काल संपन्न झालं छत्रपती शिवराय आणि महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा.. हा सोहळा तसा प्रतिकात्मक..१५ एप्रिल १६५७ ला म्हणजेच बरोबर ३७० वर्षांपूर्वी असाच विवाह सोहळा संपन्न झाला होता. या सोहळ्याचे स्मरण म्हणून छत्रपती शिवरायांची सासुरवाडी असलेल्या करवंड येथे आ. श्वेताताईंच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यमंत्रालयाच्या वतीने या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चाँद लागले..हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असावा डोळ्यांचे पारणे फेडणाराच होता..

karavand

आ. श्वेताताई महाले यांच्या कल्पक नियोजनाचे यावेळी सर्वांनीच कौतुक केले.या सोहळ्याला मंत्री महोदयांसह पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायदें यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगराध्यक्षांची उपस्थिती होती. प्रारंभी करवंड नगरीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांची वाजत गाजत पारंपारिक मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत मावळ्यांच्या वेषात नागरिक सहभागी झाली.. ही मिरवणुक मुख्य मंडपात आल्यानंतर वैदिक मंत्रोच्चाराने विवाह सोहळा साजरा झाला. 

करवंड
 
यावेळी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितले की ,१५ एप्रिल १६५७ रोजी पार पडलेला शिवराय आणि महाराणी गुणवंताबाई यांचा विवाह सोहळा हा केवळ ऐतिहासिक प्रसंग नसून स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. करवंटची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी येथे पडझड झालेल्या बुरुजांचे पुनरजीवन, राजवाड्याचे संवर्धन महाराणी गुणवंताबाई यांचा भव्य पुतळा आणि पर्यटन विकासासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचाही खास करून उल्लेख केला, जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडलेत. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हिंदुत्व बघायला मिळालं नसतं असेही ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. यावेळी त्यांनी आ. श्वेताताई महाले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले.
 आ. श्वेताताई महाले पाटील यांचे भाषणही विशेष प्रभावी झाले. त्या बोलतांना म्हणाल्या की, करवंद गावाला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, महाराणी गुणवंताबाई साहेब या करवडीच्या कन्या असल्याचा अभिमान समस्त जिल्हा वासियांना आहे. या ऐतिहासिक वारसाच्या जतनासाठी शिवप्रेमी गेली 40 वर्षे प्रयत्न करत होते. माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर या मागणीला न्याय मिळाल्याचे आ. श्वेताताई म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने इतिहास जमा झालेला इतिहास पुन्हा जिवंत केल्याचे त्या म्हणाल्या. या महोत्सवासाठी पुढाकार घेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे प्रस्ताव मांडला व विधिमंडळात पाठपुरावा केला या कामी आमदार महेश लांडगे यांचे सहकार्य लाभल्याचेही आ. श्वेताताई महाले यांनी नमूद केले.
आपल्या भाषणातून आमदार श्वेता ताई महाले यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या. करवंद येथे महाराणी गुणवंताबाई साहेब यांचे भव्य स्मारक उभारणे, ५२ गुरुजांच्या प्रतिकृती उभारणे, चिखली बुलढाणा मार्गाची रुंदीकरण करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. 
करमंड गावातील सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन या महोत्सवाला मोठे सहकार्य केले. अठरापगड जातींच्या ग्रामस्थांनी शिवकालीन वेशभूषित सहभाग घेतल्याने संपूर्ण गावात ऐतिहासिक वातावर निर्माण झाले होते. घराघरांवर भगवे ध्वज पडत होते..