डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा! संत चोखोबारायांच्या पुण्यभूमीत निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार प्रदान! उपमुख्यमंत्री शिंदेंचे भाषण गाजले;

 पुरुषोत्तम महाराजांचे केले कौतुक, म्हणाले, मंदिर हे संस्काराचे केंद्र ! लाडकी बहीण योजनेबद्दल म्हणाले.....
 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वारकरी आणि शेतकरी हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांना दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो. कुठल्याही कामाला धार्मिक अधिष्ठान असले पाहिजे. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठानाचे महत्त्व अधिक आहे. मी समाज पंढरीचा कार्यकर्ता आहे सत्ता पंढरीचा नाही. इसरूळ येथील संत चोखोबाराय मंदिरासाठी आवश्यक ते सर्व काही करू, तुम्ही काही चिंता करु नका..कारण मंदिर हे संस्काराचे केंद्र आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी संत चोखोबाराय यांचे मंदिर उभारणाऱ्या हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्याही कार्याचा गौरव केला.चिखली तालुक्यातील इसरूळ येथे संत चोखोबारायांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते निलेश महाराज झरेकर यांना गीता परिवाराच्यावतीने देण्यात येणारा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ना.शिंदे यांचे झालेले भाषण नेहमीप्रमाणे गाजले... लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केले. यावेळी मंचावर स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव, खासदार संदीपान भुमरे, आमदार श्वेता ताई महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी, पुरुषोत्तम महाराज पाटील यांची उपस्थिती होती.

गीता परिवाराच्या वतीने कारागृहातील बंदिवानांना सदवर्तनाचे धडे देणाऱ्या निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण स्वामी गोविंददेव गिरी आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना ना.शिंदे यांनी आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असल्याचे सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संताचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच त्यांचे काम अतिशय जबरदस्त सुरू आहे. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचे काम भारतीय लष्कर करीत आहे. आतंकवाद्यांनी कुंकू पुसण्याचे काम केलं त्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहे. हा घुसके मारणारा भारत आहे. आमच्या नादाला आता लागू नका असे पाकिस्तानला ठणकावून सांगितले असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री असताना मी कार्यकर्ता म्हणून काम केले, आताही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे सगळं काही चांगलं सुरू आहे असे म्हणत लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही, कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो असेही एकनाथ शिंदे म्हणाले....