भक्तीरसात चिंब करणारी सायंकाळ!"मोगरा फुलला"चे पहिले पुष्प! गणेश शिंदे म्हणाले, डोळ्यातलं प्रेम आणि हृदयातलं वात्सल्य म्हणजेच संतत्व; संत चरणीच माणसाचं मन स्थिर होऊ शकतं...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा अर्बनच्या गोवर्धन सभागृहात शनिवारची (दि.१४ सप्टेंबर) सायंकाळ भक्तीरसात चिंब भिजणारी ठरली. बाहेर पडून गेलेला पाऊस आणि आत गणेश शिंदे यांनी गोड वाणीतून "ज्ञानोबा ते तुकोबा" पर्यंत संत साहित्याचा दाखला देत केलेल्या निरूपणात श्रोत्यांना विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन केलं. सोबतीला सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांनी केलेले अभंग गायन टाळ्या मिळवून गेले. साडेसातशे वर्षापासून ज्ञानोबांना आपण माऊली म्हणत आलो आहोत. ज्ञानोबा आईची भाषा बोलतात. खऱ्या अर्थाने डोळ्यातलं प्रेम आणि हृदयातला वात्सल्य म्हणजे संतत्व होय. माणसाचं मन चंचल आहे, ते संतचरणी स्थिर होऊ शकतं असं गणेश शिंदे म्हणाले.

बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित "मोगरा फुलला"या निरूपणात पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. सुरुवातीला बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी व चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, गणेश शिंदे यांनी भारतमाता पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी गणेश शिंदे, सौ सन्मिता धापटे-शिंदे, यांचे सह त्यांच्यासोबत असलेले वादक, कलाकारांचा स्वागत सत्कार केला.
  "रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा.. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा" .. या माऊलींच्या अभंग गात सौ सन्मिता शिंदे कार्यक्रमाला सुरुवात केली. गणेश शिंदे यांनी या अभंगाचा आधार घेत माणसाचं मन काहीही केलं तरी चंचल असतं ते स्थिर होत नाही. बहिणाबाईंच्या "मन वढाय वाढय" चा देखील त्यांनी यावेळी दाखला देत माणसाची मनोवस्था आणि आजची स्थिती सांगितली. ज्ञानोबा माऊली हे खऱ्या अर्थाने आईची भाषा बोलतात असं सांगत आपण वडील आणि आई असा भेद भाषेमध्ये करू शकतो का असा प्रश्न विचारला. मुलाचे नाव गणेश असेल तर आई त्याला गणू म्हणते. बाळासाहेब असेल तर बाळू म्हणते. आई "ऊकाराची" भाषा बोलते. तसेच ज्ञानोबा सुद्धा ऊकाराची भाषा बोलतात. एवढेच काय तर "अवगुण"या शब्दाला देखील ते "अवगुणू" म्हणतात. आपण चांगल्या माणसाला देखील चांगलं म्हणत नाही, हा आपल्यातला आणि संतातला फरक आहे.संताचे जगावर खूप उपकार आहेत. ज्ञानोबांनी आपल्याला गोड भाषेमध्ये समजावून सांगितल आहे. संत जसे बोलतात तसेच वागतात. ज्ञानोबांनी अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोलायला हवं असं सांगितले आहे; पण आपण कसं बोलतो,कसे वागतो हे पाहिलं पाहिजे. नुसतं चांगल बोलल तरी आयुष्यातले अर्ध प्रश्न संपून जातील. संतांनी आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला. संतांचे जेवढे भगवंतावर प्रेम आहे, तेवढेच भगवंताचे सुद्धा संतावर आहे. भगवंता हा केवळ आणि केवळ भावाचा भुकेला असतो. पण आज सगळं काही दाखवायचं आहे म्हणून सुरू आहे.
संत नामदेवांमुळेच आपल्याला ज्ञानोबांच्या वाट्याला आलेले दुःख कळालं. नामदेवांचे मोठे उपकार आपल्यावर आहेत. संत पांडुरंगाला भेटायलाच का जातात. त्यांनी वारी करावी हे प्रमाण देऊन सांगितलं आहे. वारी म्हणजे आध्यात्मिक अनुभूतीचा, पांडुरंग भेटीचा मार्ग आहे. संत म्हणतात तसं पांडुरंगाला "आलिंगन" द्यावं, नाही जमलं पायरीवर डोकं ठेवून परतावं. तेही जमत नसेल तर कळस दर्शन तरी साधाव आणि नाहीच जमलं तर "पाहता राऊळाची ध्वजा" ..त्याही पुढे वारी सोपी करून पंढरपुरात पाय तरी लागावा एवढे साधं आणि सोपं संतांनी आपल्याला सांगितल आहे. वरवर कोणाला दाखवण्यासाठी काहीही करू नका. आपल्याकडे किती संपत्ती आहे, हे आपण सांगू शकतो; पण जगायचे किती क्षण उरले आहेत हे मात्र सांगू शकत नाही. माणसातला देव शोधा. त्यात आनंद शोधा आणि जगणं समृद्ध करा असंही गणेश शिंदे म्हणाले. ज्ञानोबाराय उलगडून सांगताना गोविंदपंत आणि मीराबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या विठ्ठलपंत त्यांचे पैठणला जाणे. पुढे विठ्ठल पंतांचा रुक्मिणीशी विवाह या टप्प्यापर्यंत कथा निरूपण केले. प्रारंभी पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले.
   
या कार्यक्रमासाठी शहरातील दर्दी रसिकांची उल्लेखनीय गर्दी केली होती. बुलडाणा अर्बन संस्थेचे सर व्यवस्थापक श्री कैलाश कासट, श्री अनंताभाऊ देशपांडे व संस्थेचे पदाधिकारी तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.
या या शेजारणीने बरं नाही केलं ग बया !!.....
गणेश शिंदे ज्ञानोबा उलगडून सांगत असताना सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांनी अभंग गायन रूपाने दिलेली साथ मोलाची ठरली. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, असो की संत चोखोबांचा अबीर गुलाल उधळीत रंग , नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग .. गात श्रोत्यांमुखी पांडुरंग घोष वदवला. सोबतच मनी नाही भाव , देवा मले पाव.. या तुकडोजी महाराजांच्या भजनाने अंतर्मुख देखील केले. "या या शेजारणीने बरं नाही केलं ग बया... मला पंढरीला नेलं ग बया" हे भारुड आणि "या पंढरपुरात काय वाजत गाजत , सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं" सह अन्य प्रसंगानुरुप अभंगगीत सादर केले.