अफू लागवडीची परवानगी द्या; अंढेऱ्याचे शेतकरी संतोष सानप यांना व्हिलन बनवल्या जातयं! रविकांत तुपकर असं का म्हणाले?
Updated: Feb 25, 2025, 16:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यात महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत रविकांत तुपकर यांनी बोलतांना अफू लागवडी संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे संतोष सानप नावाच्या शेतकऱ्याच्या शेतातून साडेबारा कोटींची अफू जप्त करण्यात आली होती. रविकांत तुपकर यांनी संतोष सानप यांना व्हिलन करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.याशिवाय रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना अफू लागवडीची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर ही वेळ आलेली आहे. मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये खस खस लागवडीसाठी शासनाकडून प्लॉट दिल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील तशी परवानगी द्यावी असेही रविकांत तुपकर म्हणाले. अंढेऱ्याचे शेतकरी संतोष सानप यांना विनाकारण व्हिलन बनवण्यात येत आहे असेही ते म्हणाले...
संतोष सानप यांनी खसखस लावली मात्र पोलिस म्हणतात अफू. अफू बनवण्याची प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा रविकांत तुपकर यांनी आपल्या भाषणातून यावेळी सांगितले. खसखशीचा उपयोग मसाल्यात होतो, औषधी म्हणून देखील त्याचा उपयोग होतो. त्यामुळे औषधी साठी खसखस लागवण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना परवानगी द्यावी असेही ते म्हणाले. संतोष सानप यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मात्र क्रांतिकारी शेतकरी संघटना संतोष सानप यांच्या पाठीशी आहे, त्यांना जामीन मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असेही रविकांत तुपकर म्हणाले...