शेतरस्ता बंद केल्याचा आरोप; रुईखेड मायंबा येथील महिला शेतकऱ्यांनी सुरू केले उपोषण !

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे शेतात जाणारा रस्ता अडविल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी महिलांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गट क्रमांक २५४ मधील शेतरस्ता तात्काळ खुला न केल्याने महिलांनी ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. 
निवेदनात म्हटले आहे की, रुईखेड मायंबा येथील काही शेतकऱ्यांची शेती गावाबाहेर असून त्या ठिकाणी जाण्यासाठी गट क्रमांक २५४ मधून जाणारा शेतरस्ता हा एकमेव मार्ग आहे. मात्र, गावातील प्रमोद सुरेश फेफाळे यांनी हा रस्ता अडविल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाणे-येणे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या संदर्भात संबंधित महिलांनी यापूर्वी बुलढाणा तहसील कार्यालयात दाद मागितली होती. त्यानुसार तहसीलदारांनी शेतरस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाला विरोध करत संबंधित व्यक्तीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. या अपीलमध्येही शेतरस्ता खुला करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अर्जदारांनी सांगितले.तथापि, दोनदा प्रशासनाचे आदेश होऊनही प्रत्यक्षात शेतरस्ता खुला करण्यात आलेला नसल्याचा आरोप करत महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
आदेशांची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतात जाण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर मंगलाबाई वसंता वाघ, रूखमनबाई पंढरीनाथ तायडे, बनाबाई बाबुराव तायडे, केसरबाई काशिनाथ तायडे, कांताबाई महादु वाघ, ऊषाबाई नारायण ऊगले, सिंधुबाई कैलास फेफाळे, नर्मदाबाई उत्तम तायडे, जिजाबाई मोतीराम वाघ आणि अनिता हरी ऊगले या महिलांनी ११ मार्चपासून संबंधित शेतरस्त्यावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार महिलांनी केला आहे.