अटाळीत ‘लव्ह जिहाद’चा आरोप! हिंदू संघटना आक्रमक; उद्या श्री क्षेत्र अटाळी कडकडीत बंदची हाक! तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार; खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू....

 
 खामगाव (भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : श्री क्षेत्र अटाळी येथे तरुणीला फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपावरून मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप देत हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, घटनेच्या निषेधार्थ उद्या, रविवार, ११ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र अटाळी कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोपीला तातडीने अटक करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अटाळी येथील एका शेतकऱ्याच्या मुलीला गावातील एका तरुणाने फूस लावून जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप आहे. ही घटना ९ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजेपासून १० ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजेदरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी १० ऑक्टोबर रोजी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रवी मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

हिंदू संघटना आक्रमक; बंदचे आवाहन

या घटनेनंतर अटाळी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने उद्या गाव बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सोशल मीडियावरही बंदचे आवाहन करणारे संदेश आणि पोस्टर प्रसारित होत आहेत. या बंदला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांच्या तपासाकडे लक्ष

तरुणीचा शोध, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.