दादुलगाव पुनर्वसन गावठाणात भ्रष्टाचाराचा आरोप!अपूर्ण कामांमध्येच हॅन्डओव्हर दिल्याने ग्रामस्थ संतप्त; उच्चस्तरीय चौकशीची मागणी...

 
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील दादुलगाव येथील नवीन पुनर्वसन गावठाणामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, अनेक मूलभूत सुविधा अपूर्ण असतानाच संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमत करून गावठाणाचा हॅन्डओव्हर दिल्याचा आरोप पुढे आला आहे. संपूर्ण प्रक्रिया ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांना अंधारात ठेवून पार पाडण्यात आल्याचा आरोप होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उपोषण
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पुनर्वसन गावठाणातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, विद्युत सुविधा यांसह विविध विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली असून, अनेक कामे अर्धवट अवस्थेतच असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तरीदेखील संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी गावातील काही व्यक्तींना हाताशी धरून घाईघाईत हॅन्डओव्हर प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, या प्रक्रियेबाबत ग्रामपंचायतीला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. हॅन्डओव्हर नेमका कोणत्या नियमांनुसार आणि कोणाच्या परवानगीने करण्यात आला, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून, पावसाळ्याच्या तोंडावर या सुविधांचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून राहिलेली सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.