सगळे हिंदु एकाच आईची लेकरे! दलीत–पतीत कुणीच नाही! विभाग प्रचारक स्वप्निल राऊत यांचे प्रतिपादन! स्वामी जगदीशचैतन्यजी महाराज म्हणाले, भारतमाता विश्वगुरू! चिखलीत विशाल हिंदु संमेलन उत्साहात

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपण सर्वजण भारत मातेची लेकरे आहोत. कुणीही हिंदु दलीत पतीत नाही. आपल्या सगळ्यांना भारतमातेच्या उद्धारासाठी कार्य करायचे आहे असे. प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बुलढाणा विभागाचे विभाग प्रचारक स्वप्निलजी राऊत यांनी केले. चिखली येथील गोरक्षण वस्तीत सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित विशाल हिंदु संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी आचार्य स्वामी जगदीशचैतन्यजी महाराज यांचेही आशीर्वचन उपस्थितांना लाभले..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात वस्ती, मंडल केंद्रावर विशाल हिंदु संमेलने होत आहे. यानिमित्ताने चिखलीतील गोरक्षण वस्तीत देखील विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन २२ जानेवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ.नंदा कुसळकर व नारायण शितोळे यांच्या भजनी मंडळाने वस्तीतून स्वामी जगदीशचैतन्यजी महाराज यांचे टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत करीत मिरवणूक काढण्यात आली. भारतमातेचे पूजन आणि आरतीनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या विभाग प्रचारक स्वप्निलजी राऊत यांनी व्यवहारातून जातीभेद संपुष्टात आणण्याचे आवाहन केले. जिथे जिथे हिंदू समाजाची संख्या कमी झाली तिथे तिथे राष्ट्रद्रोही संख्या वाढते या इतिहासाची आठवण त्यांनी करून दिली. हिंदु समाजाच्या संस्काराचे केंद्रबिंदू कुटुंब आहे, त्यामुळे कुटुंब प्रबोधनाची गरज व्यक्त करत नव्या पिढीला संस्कार देतांना त्याची सुरुवात कुटुंबातूनच झाली पाहिजे असे ते म्हणाले.भारतमातेच्या उद्धारासाठी आपल्याला प्रत्येकाला काम करायचे आहे. प्रत्येकाला बंदूक घेऊन सीमेवरच जावे लागेल असे नाही स्वदेशीचा आग्रह आपल्या जीवनात ठेवून देशसेवा करता येते. झाडांचे संगोपन करून, पर्यावरण समृद्ध करून देशसेवा करता येते. आपण नेहमी आपल्या हक्कांची चर्चा करतो, मात्र देशाप्रती आपली काही नागरी कर्तव्ये आहेत त्याचेही पालन आवश्यक असल्याचे स्वप्निलजी राऊत म्हणाले.

 भारत हे चिरंजीव राष्ट्र– आचार्य स्वामी जगदीशचैतन्यजी महाराज 
भारत ही संताची भूमी आहे. संताची कधीही जातिभेदाचा पुरस्कार केला नाही. जाती व्यवस्था ही व्यवसाय आधारित होती, मात्र परकीय लोकांनी याचा वापर हिंदू समाजात भांडण लावण्यासाठी केला. ज्याप्रमाणे मानवी शरीराचे विविध अवयव आहेत, प्रत्येकाचे काम वेगळे आहे. प्रत्येक अवयवाचे महत्व आहे..
शरीराचे अवयव एकमेकांशी भांडतात का? असा सवाल उपस्थित करीत हिंदु समाजाची व्यवस्था ही कर्माच्या आधारावर होती असे ते म्हणाले. यामध्ये उच – नीच असा भेदाभेद कधीच नव्हता असे स्वामीजी म्हणाले. आपल्या भारताचा इतिहास हा गौरवशाली आहे, भारत हे चिरंजीव राष्ट्र आहे. हा देश "राम कृष्ण गौतम की धरती" म्हणून ओळखला जातो. सगळ्या जगाने जे ज्ञान मिळवले ते भारताकडूनच मिळवले, भारतमाता विश्वगुरू आहे असे म्हणत सगळ्यांनी देव देश धर्मासाठी काम करण्याचे आवाहन स्वामीजींनी केले.