चिखली येथे कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन...! वाचा कारण काय?
May 10, 2025, 08:04 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने कृषी सहायकांच्या विविध मागण्यासाठी राज्यस्तरावर जे आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला पाठिंबा व कृषी सहाय्यक यांच्या विविध मागण्यांसाठी चिखली तालुक्यातील कृषी सहाय्यक यांनी पंचायत समिती कार्यालयावर धरणे आंदोलन केले. राज्याचे कृषिमंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या नावाने लिहिलेल्या निवेदनामध्ये चिखली तालुक्यातील कृषी सहायकांनी दिनांक 5 मे पासून सुरू केलेल्या निषेध आंदोलनाचे रूपांतर हळूहळू राज्यस्तरीय एकात्म व मोठ्या आंदोलनात होताना दिसत आहे.
दिनांक पाच मे रोजी फक्त काळ्याफिती बांधून निषेध नोंदवणाऱ्या कृषी सहाय्यक यांनी काल सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. व आज 8 मे रोजी सर्व कृषी सेवकांनी सामूहिक रजा घेऊन आपले आंदोलन जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे आपल्या कृतीने दर्शवून दिले. उद्या ही कृषी सहाय्य सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकणार असून दिनांक 15 मे पर्यंत यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कृषी सहाय्यक संबंधित असलेल्या सर्व योजनेच्या कामावर बेमुदत काम बंद आंदोलन करून बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर रुजू करून घ्यावे, कृषी सहाय्यक यांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, डिजिटल स्वरूपातील कामे करण्यासाठी कृषी सहाय्यक यांना शासनाकडून लॅपटॉप प्रदान करण्यात यावे, यासह ग्राम स्तरावर मदतीसाठी कृषी मदतनीस देणे अशा व इतर काही मागण्यांसाठी कृषी सहाय्यक यांनी शासनाकडे वारंवार मागणी करू नये त्यांच्या या मागण्यावर शासनाकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही त्यामुळेच शासनाच्या विरोधात व आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यस्तरीय कृषी सहाय्यक संघटनेने या सौम्य ते तीव्र अशा स्वरूपात वाढत जाणाऱ्या आंदोलनाची हाक दिलेली आहे.
कृषी सहाय्यक यांच्या न्याय मागण्यासाठी सुरू असलेल्या या धरणे आंदोलन व इतर आंदोलनाला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेकडून कृषी सहाय्यकांचे स्थानिक कामकाजातील महत्त्व प्रचंड असल्याने त्यांच्या मागण्या महाराष्ट्र सरकारकडून मान्य केल्या जाव्यात यासाठी दबाव निर्माण केला जात आहे.
चिखली येथील आंदोलनाला श्री दीपक कुटे,श्री भरत शेळके आणि इतर कृषी सहाय्यक बंधू आणि भगिनींना मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.