ॲड. शर्वरी तुपकर यांचा आक्रमक पवित्रा; रात्री ११ वाजता धाडच्या पेट्रोल पंपावर धडक,अखेर शेतकऱ्यांना डिझेल द्यायला भाग पाडले..!....

सध्या खरिपाचा हंगाम तोंडावर आला असून शेतीची मशागत आणि पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू आहेत.
डिझेलअभावी ही कामे खोळंबली असतानाच, धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावर २६ मे रोजी दुपारी डिझेलचा टँकर दाखल झाला होता. टँकर रिकामे करून तात्काळ डिझेल वाटप करणे अपेक्षित असताना, पंप चालकाने शेतकऱ्यांना तिन दिवस ताटकळत ठेवले. रात्री १० वाजेपर्यंत शेतकरी डिझेलच्या प्रतीक्षेत रांगेत उभे होते. मात्र, "आता डिझेल मिळणार नाही, उद्या सकाळी वाटप केले जाईल," असे पंप कर्मचाऱ्यांनी सांगताच शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी तातडीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांच्याशी संपर्क साधला.
ॲड. तुपकर यांनी कसलाही विलंब न करता, रात्रीच्या वेळी तातडीने धाड येथील पेट्रोल पंपावर धडक दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापनाला जाब विचारत तात्काळ डिझेल वाटप सुरू करण्याची मागणी केली. सुरुवातीला पंप चालकाने मुजोरी दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र ॲड. तुपकर यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या गंभीर प्रकाराची माहिती दिली. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी वणवण भटकावे लागत आहे. डिझेल उपलब्ध असतानाही ते न देणे आणि शेतकऱ्यांना हुकूमशाही पद्धतीने नकार देणे हा अन्याय आहे. बळीराजाची अशी अडवणूक खपवून घेतली जाणार नाही असा इशारा ॲड. शर्वरी तुपकर यांनी दिला.
ॲड. शर्वरी तुपकर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर पेट्रोल पंप प्रशासनाला माघार घ्यावी लागली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रात्री ठीक १२ वाजता पेट्रोल पंपावर डिझेल वाटप पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बंडू उर्फ समाधान नागवे, आकाश माळोदे, गजानन नाईकवाडे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.