जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ॲड. शर्वरी तुपकरांचा ५ तास ठिय्या! अखेर प्रशासन नरमले, पीक विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावरच उठल्या! कर्जमुक्तीसाठी तूपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच...

 
 बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी दुपारी ॲड.शर्वरी तुपकर यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जवळपास ५ तास ठिय्या आंदोलन केले. दुपारी साडेतीन वाजता सुरू केलेले ठिय्या आंदोलन रात्री साडेआठच्या सुमारास मागे घेण्यात आले. पीकविमा कंपनीने शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी आग्रही भूमिका ॲड.शर्वरी तुपकर यांनी घेतली होती. ॲड.शर्वरी तुपकरांच्या विविध प्रश्नांनी निरुत्तर झालेल्या जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी अखेर भारतीय कृषी विमा कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरच ॲड.शर्वरी तुपकर यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र असे असले तरी निवासस्थानासमोर संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी  रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे.

 रविकांत तुपकर यांचे १५ जूनपासून संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली. ठीक ठिकाणी शेतकऱ्यांची निदर्शने होत आहेत. दरम्यान याच आंदोलनाचा एक भाग म्हणून ॲड.शर्वरी तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह दुपारी साडेतीनला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर पिकविमा पैकी अद्यापही १ कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाहीत. कंपनीने केलेल्या करारानुसार ३० दिवसांच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप करीत कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड.शर्वरी तुपकर यांनी लावून धरली. अखेर तीस तासांच्या ठिय्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे विमा कंपनीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तयार झाले. मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ॲड.शर्वरी तुपकर यांनी घेतली. अखेर रात्री साडेआठच्या सुमारास "एफआयआर" हाती आल्यावरच ॲड.शर्वरी तुपकर यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. ॲड.शर्वरी तुपकर यांची आक्रमकता पाहता जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते..

फसवणुकीचा गुन्हा..

जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १३३३ शेतकऱ्यांची १ कोटी ५९ लाख रुपयांची नुकसान भरपाई प्रलंबित असून  कंपनीशी झालेल्या करारा प्रमाणे ३० दिवसांच्या आत रक्कम जमा होणे अपेक्षित होते. मात्र कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही कंपनीने जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम स्वतःकडे  ठेवल्याचा आरोप तक्रारीत आहे. सदर रक्कम हडप करण्याचा कंपनीचा हेतू असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून भारतीय कृषी विमा कंपनी मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक व कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२),३१८ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीचा तपास  बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील करीत आहेत.