चिखली तालुक्यातील तरुण निघाला नकली पोलीस!; संभाजीनगरमध्ये गणवेश, बनावट ओळखपत्रांसह जेरबंद!

 अमडापूरच्या राहुल सातकरला सिटी चौक पोलिसांनी पकडले; ठाणे शहर पोलिसांच्या नावाच्या नेमप्लेटपासून ‘कमांडो’ टी-शर्टपर्यंत साहित्य जप्त....

 
 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अंगावर खाकी गणवेश, गळ्यात पोलिसांचे ओळखपत्र आणि नावाची नेमप्लेट… सोबत पोलिसांचे बूट, बेल्ट अन् कमांडो लिहिलेल्या टी-शर्टसह संपूर्ण साहित्य! मात्र, हा खरा पोलीस नव्हे, तर पोलिस असल्याची बतावणी करणारा तोतया निघाला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमडापूर येथील ३१ वर्षीय राहुल रोहिदास सातकर याला छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांची बनावट ओळखपत्रे, चार बनावट नेमप्लेट आणि पोलिसांशी संबंधित विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे चिखली तालुक्यातील अमडापूर गावाचे नाव चर्चेत आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास आरोपी राहुल सातकर हा छत्रपती संभाजीनगरमधील सिटीझन हॉटेलमध्ये आला. त्याने लॉज मालकाला स्वतःचे आधार कार्ड आणि महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले. आपण पोलीस कर्मचारी असल्याचे सांगत खेळण्यासाठी आल्याचे आणि काही दिवस राहण्यासाठी खोली हवी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याच्या या कथित तोतयेगिरीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला.

झडतीत पोलिसांचे संपूर्ण साहित्य!

गोपनीय माहितीच्या आधारे सिटी चौक पोलिसांनी सापळा रचून राहुल सातकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली असता पोलिसांशी संबंधित अनेक वस्तू आढळून आल्या. त्यात महाराष्ट्र पोलिसांची दोन बनावट ओळखपत्रे, लॅनयार्डसह खाकी गणवेश आणि चार बनावट नेमप्लेटचा समावेश आहे. या नेमप्लेटवर ठाणे शहर पोलिसांशी संबंधित पदनामे आणि क्रमांक नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय पोलिसांचा चामडी बेल्ट, डीएमएस शूज, कट शूज, पिस्टल पाऊच, पोलिस असे लिहिलेला पांढरा जॅकेट, डांगरी ड्रेस, ट्रॅक सूट, परेड अँकलेट, ग्राउंड शीट, पी कॅप, फटीक कॅप, राऊंड कॅप आणि रेनकोटही जप्त करण्यात आला. तसेच ‘COMMANDO’ आणि ‘QRT’ असे लिहिलेले काळे टी-शर्ट, सॅमसंग व नोकिया कंपनीचे मोबाईल आणि ट्रॉली बॅग असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. जप्त केलेल्या मुद्देमालाची नमूद किंमत ६ हजार ५०० रुपये आहे.

 तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आनंद राधाकृष्ण वाहुळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) आणि २०५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष खरात यांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक फौजदार मिसाळ पुढील तपास करीत आहेत.

तोतयेगिरीमागे नेमका हेतू काय?

अमडापूर येथील राहुल सातकर याच्याकडे पोलिसांचा गणवेश, बनावट ओळखपत्रे आणि विविध पदनामांच्या नेमप्लेट आढळल्याने त्याने या साहित्याचा वापर नेमका कशासाठी केला, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्याने यापूर्वी अन्य ठिकाणी पोलिस असल्याची बतावणी करून कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकरणातील आरोपी चिखली तालुक्यातील अमडापूरचा रहिवासी असल्याने स्थानिक पातळीवरही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आरोपीने अन्य ठिकाणी फसवणूक केली आहे का, याबाबत तपासातूनच अधिक माहिती समोर येणार आहे.