बुलढाण्यात १२ एप्रिलला एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा! सत्यशोधक पद्धतीने पार पडणार सोहळा; मानस फाउंडेशनचा पुढाकार...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मानस फाउंडेशन च्या वतीने सामूहिक पुनर्विवाह सोहळा व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. १२ एप्रिल रोजी सैनिक मंगल कार्यालय बस स्टँड समोर हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा सोहळा सत्यशोधक पद्धतीने केला जाणार असून सर्व विधी विधवा घटस्फोटीत महिलांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ८ जोडप्यांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे. याबाबतची माहिती आज १० एप्रिल रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवनात  आयोजित पत्रकार परिषदेत मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी.एस लहाने यांनी दिली. 

मानस फाउंडेशन तर्फे समाजातील एकल महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी पुनर्विवाहाची संकल्पना राबवली जात आहे. आतापर्यंत ९० पेक्षा अधिक पुनर्विवाह मानस फाउंडेशन कडून करण्यात आले. येत्या १२ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकल महिला (विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत) यांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ८ जोडप्यांचे पुनर्विवाह होणार आहे. हा सोहळा सत्यशोधक पद्धतीने होणार आहे, सर्व विधी विधवा घटस्फोटीत महिलांच्या हस्ते केले जाणार आहेत. बुलढाणा येथील बस स्टँड समोरील सैनिक मंगल कार्यालय इथे हा सोहळा पार पडणार असल्याची  माहिती मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डी.एस. लहाने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.