डोणगाव आरोग्य केंद्रात दोन कर्मचाऱ्यांत हाणामारी; कारणे दाखवा नोटीस बजावली! रुग्णालयातील वादामुळे खळबळ; वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड यांची कारवाई, चौकशीनंतर पुढील निर्णयाकडे लक्ष!

ADVT 👆
रुग्णांच्या गर्दीतच वादाचे नाट्य!
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज सुमारे ३०० बाह्यरुग्णांची तपासणी होत असल्याची माहिती आहे. प्रसूती सेवा तसेच अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठीही रुग्ण या केंद्रात येतात. अशा महत्त्वाच्या आरोग्यसेवा केंद्रातच कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याने रुग्णसेवेच्या वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत गेल्याने हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
चौकशीनंतर पुढील कारवाई होणार?
संबंधित कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणात काय खुलासा केला जातो, तसेच चौकशीत नेमकी कोणती बाब समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे. चौकशीअंती प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य केंद्रासारख्या संवेदनशील ठिकाणी शिस्त राखली जावी आणि रुग्णसेवेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.